मुंबई 26 नोव्हेंबर : राज्यातील सत्तांतराच्या वेळी केंद्रस्थानी राहिलेल्या गुवाहाटीचं स्थान शिंदे गटासाठी काही वेगळंच आहे. अशात आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार आणि खासदार कुटुंबासह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व्खाली गुवाहाटीला गेले आहेत. गुवाहाटीमधील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या दर्शनासाठी हे सगळे याठिकाणी गेले आहेत. मुख्यमंत्र्यांसह आमदारांच्या या गुवाहटी दौऱ्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना निशाणा साधत कामाख्या देवीकडे प्रार्थना केली आहे.
काय म्हणाले आमदार रोहित पवार -
हे माता कामाख्या देवी..राज्यातील सामान्य माणसांच्यावतीने तुला प्रार्थना! सत्ता'बदला'साठी तू आशिर्वाद दिला पण आता बदल्याची भाषा थांबावी. राज्याचे उद्योग गुजरातने पळवू नये. युवांच्या नोकरीचा घास हिरावला जाऊ नये. महाराष्ट्राची बदनामी सहन करू नये. वाचाळ मंत्र्यांना तारतम्य यावं, अतिवृष्टीतील बळीराजाला मदत मिळावी, असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
तसेच ते म्हणाले की, राज्याची भूमी बळकावण्याची भाषा करणाऱ्यांना धडा मिळावा. अंधश्रध्दा, तंत्रमंत्र, जादूटोणा याला सरकारने बळी पडू नये. तसंच राज्याचा स्वाभिमान आणि अस्मिता अबाधित रहावी. हे अडचणींचे 'डोंगार' पार करण्यासाठीही जे-जे हवं ते सर्व राज्य सरकारला दे!, असे आमदार रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
हे माता कामाख्या देवी.. राज्यातील सामान्य माणसांच्यावतीने तुला प्रार्थना! सत्ता'बदला'साठी तू आशिर्वाद दिला पण आता बदल्याची भाषा थांबावी.. राज्याचे उद्योग गुजरातने पळवू नये.. युवांच्या नोकरीचा घास हिरावला जाऊ नये.. महाराष्ट्राची बदनामी सहन करू नये.. वाचाळ मंत्र्यांना तारतम्य यावं, pic.twitter.com/YYuC39W6um
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 26, 2022
जून महिन्यात म्हणजेच जवळपास पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला होता. यावेळी आसाममधील गुवाहाटी सतत बातम्यांमध्ये झळकत होतं. कारण याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे आमदार थांबले होते.
हेही वाचा - राऊतांचा अनुभव मोठा, त्यांना सिल्वर ओकवरून....; राधाकृष्ण विखे पाटलांचा जोरदार हल्लाबोल
गुलाबराव पाटील असणार गैरहजर -
एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सर्व आमदार आज गुवाहाटीला दर्शनासाठी जाणार असले तरी गुलाबराव पाटील मात्र यावेळी अनुपस्थित असणार आहेत. याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे. 'जिल्हा दूध संघाची निवडणूक आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. निवडणुकीमुळे मला गुवाहाटीला जाता येणार नाही. मी जरी जाणार नसलो तरी आमचे बाकीचे सर्व आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाणार आहेत. शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत', असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.