मुंबई, 2 जानेवारी : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर दालन स्वीकारत असताना अजित पवार यांनी मंत्रालयातील 602 क्रमांकाचं दालन नाकारल्याची चर्चा होती. अंधश्रद्धेतूनच अजित पवार यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं गेलं. याबाबत प्रश्न विचारताच अजित पवार पत्रकार परिषदेत काहीसे भडकलेले पाहायला मिळाले. ‘मी कोणतंही दालन नाकारलं नाही. मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठतेनुसार दालनाचं वाटप केलं आहे. आपण आता 21 व्या शतकात आहोत. अंधश्रद्धेतून दालन नाकारण्याचा विषय नाही. पवार कुटुंब कधीही अंधश्रद्धा मानत नाही. स्वत: शरद पवार यांनी कधीही अंधश्रद्धा मानली नाही. आम्ही त्याच प्रकारची भूमिका घेतो,’ असं स्पष्टीकरण अजित पार यांनी म्हटलं आहे. 602 नंबरच्या दालनाची चर्चा आणि मंत्र्यांची टाळाटाळ सध्या मंत्रालयातील एका नको असलेल्या दालनाची चर्चा रंगली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता सर्व मंत्र्यांना दालन देण्याचं काम सुरू झालं आहे. यामध्ये 602 नंबरच्या दालनाबाबत मात्र अनेकांकडून नकारघंटा वाजवली जात आहे. यामागे त्या दालनाबद्दल नेत्यांच्या मनात असलेली भीती आहे. 602 नंबरच्या या दालनाबद्दल एक समज पसरला आहे. तो म्हणजे इथं जो मंत्री बसतो तो आपला कार्यकाल पूर्ण करू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक 2022 पर्यंत पूर्ण करणार, अजित पवारांची घोषणा मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यावर असलेलं हे दालन अद्याप कोणाला देण्यात आलेलं नाही. या दालनामध्ये एक कॉन्फरन्स रूम, कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी हॉल आणि दोन मोठ्या केबिन आहेत. सुरुवातीला या दालनात मुख्यमंत्री, वरिष्ठ मंत्री आणि मुख्य सचिव बसत होते पण आता मात्र याकडे नको असलेलं दालन म्हणून पाहिलं जातं. याआधीच्या भाजप सरकारमध्ये हे दालन एकनाथ खडसे यांना मिळाले होते. ते कृषी, महसूल आणि अल्पसंख्यांक कल्याण विभागाचं कामकाज बघायचे. पण खडसे यांना 2 वर्षातच राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यानंतर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना हे कार्यालय दिलं गेलं. त्यांचा दोन वर्षांनी हृदयविकाराने मृत्यू झाला. यानंतर हे दालन कोणालाही देण्यात आलं नाही. 2019 मध्ये भाजपचे अनिल बोंडे यांच्याकडे कृषीमंत्रीपद देण्यात आलं. तेव्हा हेच दालन बोंडेना दिले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभेत बोंडेंचा पराभव झाला. यानंतर 602 नंबरच्या दालनाबाबतचा समज आणखी वेगाने पसरला. महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनीही याआधी 602 क्रमांकाच्या दालनात बसून काम केलं आहे. त्यांनीसुद्धा इथं काम करण्यास नकार दिल्याचीही चर्चा रंगत होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.