निसर्ग चक्रीवादळानं होत्याचं नव्हतं केलं! शरद पवार थेट बांधावर, मदरशालाही दिली भेट

निसर्ग चक्रीवादळानं होत्याचं नव्हतं केलं! शरद पवार थेट बांधावर, मदरशालाही दिली भेट

चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 9 जून: 'निसर्ग' चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मंगळवारपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान झालं आहे.

शरद पवार यांनी सकाळी माणगाव, मोरबा म्हसळा या गावांना भेट दिलं. माणगावमध्ये बाजारपेठ, मोरबा येथे गावकऱ्याची विचारपूस केली. शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. शरद पवार यांनी थेट बांधावर जाऊन नुकसानाची पाहाणी केली. या दरम्यान, शरद पवार यांनी मोरबा येथील मदरशाला भेट दिली.

हेही वाचा.. 15 ऑगस्टनंतरही शाळा सुरू होणार की नाही, केंद्र सरकारनं केला मोठा खुलासा

चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 9 जून रोजी रायगड आणि 10 जूनला रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत.

शरद पवार या दौऱ्यात माणगाव, म्हसळा, दिवेआगार, श्रीवर्धन येथे भेट देणार आहेत. श्रीवर्धन येथे आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेणार आहेत. सायंकाळी 5 वाजता हरिहरेश्वर आणि नंतर 6 वाजता बागमांडलामार्गे दापोलीकडे रवाना होणार आहेत. दापोली येथे मुक्काम करणार आहेत.

दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे व स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 10 जून रोजी रत्नागिरी जिल्हा दौरा असून सुरुवातीला दापोली येथील नुकसानीची पाहणी करणार आहेत.

राज्य सरकारने कोकणच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसली...

दुसरीकडे, विरोधी पक्षाने राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. राज्य सरकारने कोकणच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहे. सरकारच्या या मदतीवर आम्ही विरोधी पक्ष म्हणून समाधानी नाही, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केलं आहे. परंतु सरकार गंभीर नाही, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. दापोलीत निसर्ग चक्रीवादळ नुकसान पाहणी करता प्रवीण दरेकर आले आहेत. यावेळी त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केला.

हेही वाचा...चक्रीवादळाने झोडपल्यानंतर 5 दिवसानंतर आली सरकारला जाग, घेतला हा निर्णय

रायगडला 100, रत्नागिरीला 75 तर सिंधुदुर्गास 25 कोटी

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील, असे सांगून तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगडला 100 रत्नागिरीला 75 कोटी रुपये व सिंधुदुर्गला 25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. नुकसानाचे पंचनाने पूर्ण झाल्यानंतर आणखी मदत दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

संकलन, संपादन- संदीप पारोळेकर

First published: June 9, 2020, 1:33 PM IST

ताज्या बातम्या