मुंबई, 12 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय संमेलन (NCP) नवी दिल्लीमध्ये पार पडलं. या संमेलनाला राज्यासह देशभरातले सगळेच नेते उपस्थित होते, पण धनंजय मुंडे (Dhananjay Munde) या संमेलनाला गैरहजर राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना धनंजय मुंडे यांच्या गैरहजरीबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी धनंजय मुंडेंच्या गैरहजेरीचं कारण सांगितलं. ‘धनंजय मुंडे आजारी होते, त्यांचा मला फोन आला होता. मी तुम्हाला त्यांचं तिकीटही दाखवतो, पण आजारी पडल्यावर करणार काय? धनंजय मुंडेंचा आजार राजकीय आजार नव्हता, ते पण मी कनफर्म केलं. माझं त्यांच्याशी बोलणं झालं,’ असं अजित पवार म्हणाले. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात सुरूवातीला धनंजय मुंडे यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार आंदोलनं केली, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या अप्रत्यक्ष इशाऱ्यानंतर मुंडे आंदोलनात दिसले नाहीत, त्यावेळीही धनंजय मुंडे गायब का झाले? या चर्चा रंगल्या होत्या. ताट, वाटी चलो गुवाहाटी, अशा घोषणा दिल्या जात होत्या, धनंजय मुंडेही तिकडे होते. धनंजय मुंडे बेंबीच्या देठापासून ओरडून बोलत होते, जसं ते कित्येक वर्षांपासूनचे शिवसैनिक आहेत. तुमचा सगळा प्रवास मला माहिती आहे. देवेंद्रजींनी प्रेम, दया, करुणा दाखवली, पण परत परत दाखवता येणार नाही, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मुंडेंना अप्रत्यक्ष इशारा दिला होता. नाराजीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या भाषणाची मागणी केली. जयंत पाटील यांना आपल्यापूर्वी बोलण्याची संधी दिल्याने अजित पवार नाराज होऊन निघून गेल्याची चर्चा समोर आली होती. विशेष म्हणजे अजित पवार हे व्यासपीठावरुन निघून जात असताना प्रफुल्ल पटेल यांनी माईकवरुन अजित पवारांना थांबण्याची विनंती केल्याचंही दिसून आलं. मात्र, अजित पवार आलेच नाहीत. या सगळ्या वादावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हे राष्ट्रीय अधिवेशन असल्यामुळे फक्त राष्ट्रीय पातळीवरचे नेते बोलले. मी राज्याचा नेता असल्यामुळे राज्यातल्या गोष्टींवरच बोलतो. मी वॉशरूमसाठी बाहेर गेलो, तरी अजित पवार नाराज म्हणून बातम्या चालवल्या गेल्या. नाराज असण्याचा बातम्या कपोलकल्पीत आहेत, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.