नाशिक 17 ऑगस्ट : नाशिक शहर ( Nashik City ) हे धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिक शहर म्हणून ओळखल जातं. नाशिक शहरात दररोज हजारो भाविक आणि पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. या ठिकाणी धार्मिक स्थळतर आहेतच मात्र निसर्गाच देखील वरदान नाशिक शहराला लाभलेले आहे. याच नाशिक शहरातील पंचवटी परिसरात श्रीरामांनी वनवास काळात पत्नी सिता आणि बंधू लक्ष्मणासोबत वास्तव्य केल्याचा रामायणात उल्लेख आहे. त्यामुळे नाशिकला जगभरात विशेष ऐतिहासिक महत्व आहे. नाशिक शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. पवित्र मानली जाणारी गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रम्हगिरीच्या कुशीत झाला आहे आणि गोदावरी नाशिक शहरातूनच पुढे जाते. गोदावरीच्या तीरावर रामकुंड परिसरात अनेक धार्मिक विधी होतात. जगभरातून भाविक विधी करण्यासाठी इथे येतात. दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्यामुळे जागतिक स्तरावर नाशिक शहराचं नाव आहे. हेही वाचा :
पुण्यातील 50 वर्ष जुना गार्डनचा वडापाव, आजही आहे खवय्यांची पहिली पसंती
नाशिक नाव पडण्यामागचा हा सांगितला जातो इतिहास पूर्वी नाशिकला किष्किंधा नगरी मुघल काळात गुलशनाबाद नावाने ही ओळखल जायचं. मात्र, नाशिकनावाचा इतिहास असा सांगितला जातो की वनवास काळात श्रीराम, लक्ष्मण पंचवटी परिसरात फिरत असताना शूर्पणखा या राक्षसीनचे नाक लक्ष्मणाने कापले होते आणि नाक कापल्यामुळे नासिका वरून नाशिक नाव पडले, असे इतिहास अभ्यासक मिलिंद सजगुरे सांगतात आणि तेव्हापासून नाशिक या नावानेच शहराची ओळख निर्माण झाली. नाशिक शहर कुठे आहे ? महाराष्ट्राच्या वायव्येस, मुंबईपासून 150 किमी आणि पुण्यापासून 205 किमी अंतरावर आहे. हे शहर यात्रेकरूंसाठी एक प्रमुख केंद्र आहे. या शहराचा सर्वात प्रमुख भाग म्हणजे पंचवटी. याशिवाय येथे अनेक मंदिरे आहेत. नाशिकमध्ये सणांच्या वेळी मोठ्या प्रमाणात लोक दिसतात.
गुगल मॅप वरून साभार
हेही वाचा : Nashik: नोकरी मिळाली नाही म्हणून सुरू केला व्यवसाय; विद्यार्थ्यांची सुटली अडचण, VIDEO नाशिकचे आकर्षण पंचवटी : याच पंचवटी परिसरात श्रीराम, सिता, लक्ष्मण यांनी वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे. सीतेचे अपहरण ही पंचवटी मधून झाले असल्याचं बोलल जातं. त्यामुळे पंचवटीला विशेष महत्त्व आहे. रामकुंड : नाशिकमधील रामकुंड हे प्रमुख आकर्षण आहे. 300 पेक्षा जास्त वर्षांपूर्वी, 1696 मध्ये चिपरोज खटकर यांनी हा रामकुंड बांधला असल्याचं सांगितल जातं. हा पवित्र कुंड 12 मीटर ते 27 मीटरच्या विशाल क्षेत्रात पसरलेला आहे. वनवासाच्या वेळी भगवान राम आणि त्यांची पत्नी सीता यांनी या पवित्र कुंडात स्नान केले होते. त्यामुळे विशेष महत्व आहे. कुंभमेळा : दर बारा वर्षांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा भरतो जगभरातून लाखो भाविक स्नान करण्यासाठी येतात. श्री काळाराम मंदिर : पश्चिम भारतातील प्रभु रामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक हे मंदीर आहे. मंदिरात प्रभू रामचंद्र, सिता, लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील 2 फुट उंचीच्या मुर्त्या आहेत. चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येतो. पांडवलेणी : 2500 वर्षापूर्वींची जुन्या लेणी आहेत. इथे पाली भाषेतील शिलालेख आहे. एकूण 24 लेणी आहेत. काही लेण्या व त्यातील मूर्त्या चांगल्या स्वरुपात तर काही खंडीत स्वरुपात शिल्लक आहेत. बुध्दस्तुप, भिक्षूंची निवासस्थाने, बुध्दबोधिसविता, जैन तीर्थकर ऋषभदेवजी, वीर मणिभद्रजी, माता अंबिकादेवी यांच्या मूर्त्या, पाच पांडवसदृशमूर्त्या, भीमाची गदा, कौरव मूर्त्या, इंद्रसभा, देवादिकांच्या मूर्त्या या सर्व लेण्यात आहेत. मूर्त्यांची शिल्पकता वाखाणण्यासारखी आहे. सीतागुंफा : वनवास काळात श्रीराम, सिता, लक्ष्मण या गुफेत राहिल्याचे अभ्यासक सांगतात. तसेच या गुफेतच एक शिवलिंग आहे. जिथं सिता शंकराची उपासना करायची अशी अख्यायिका आहे.
हेही वाचा : Nashik : कॉमेडियन मामाची झटका पाणीपुरी, खाताना मनोरंजनाचीही खात्री, VIDEO
पर्यटक म्हणतात विविधतेने नटलेले नाशिक नाशिक शहरात दररोज हजारो भाविक येत असतात. या ठिकाणी धार्मिक स्थळ तर आहेच मात्र निसर्गाच देखील वरदान नाशिकला लाभलं आहे. शहराच्या सभोवताली अनेक प्रेक्षणीय स्थळ आहेत. तसेच नाशिक खवय्यांसाठी देखील फेमस आहे अनेक चांगले पदार्थ इथे मिळत असतात. त्यामुळे विविधतेने नटलेल्या नाशिकला एकदा नक्की भेट द्या अशी प्रतिक्रिया सुनील ढिकले यांनी दिली आहे.