नाशिक, 26 मार्च : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नाशिकमधल्या मालेगाव येथे मोठी सभा होणार आहे. यासाठी ठाकरे गटाच्या नेते, कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. पक्षाची मोट पुन्हा बांधण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यभर सभा घेणार आहेत. त्यापैकी पहिली सभा कोकणातील खेड येथे झाली. तर दुसरी सभा आज मालेगावात होणार आहे. या सभेची एकीकडे जोरदार तयारी सुरू असताना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण नाशिकमधील ठाकरे गटातील महिला पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंदरविकास मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आज ठाणे येथे ठाकरे गटातील महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी 15 ते 20 महिला पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाण्यामागचं कारण विचारलं असता या महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, “नाशिकमधील ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांना बोलण्याची पद्धत नाही. तिथे सभेत स्टेजवर महिलांच्या लाली-लिपस्टिकचा विषय काढला जातो. तुमचे हात वर असतील तर तंगड्या माझ्याकडे आहेत, अशा भाषेत कोणी बोलत असेल, कोणी आमच्या चारित्र्याला धक्का पोहोचवत असेल तर त्यांच्यासोबत काम करणं आम्हाला शक्य नाही.” कोणी केला प्रवेश? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व पालकमंत्री दादाजी भुसे, महाराष्ट्र प्रदेश समन्वयक शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, सचिव चौधरी, सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी व माजी नगरसेवक यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वाचा - अंबादास दानवे शिवसेनेत प्रवेश करणार? शिंदे गटाच्या दाव्याने चर्चेला उधाण महिला आघाडी जिल्हाप्रमुख शोभाताई मगर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगलाताई भास्कर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शोभाताई गटकळ, माजी नगरसेविका अँड.श्यामलाताई दीक्षित, माजी नगरसेवक उत्तम दोंदे, माजी नगरसेवक प्रभाकर पाळदे, महिला आघाडी शहर समन्वयक ज्योतीताई देवरे, माजी शिक्षण मंडळ सभापती उप महानगर प्रमुख शशिकांत कोठुळे, उप महानगर प्रमुख शरद देवरे, उप विभाग प्रमुख कुमार पगारे, उप विभाग प्रमुख पिंटू शिंदे, विधानसभा संघटक पश्चिम अनिताताई पाटील, उप विभाग प्रमुख आशाताई पाटील, शाखा प्रमुख सीमाताई पाटील, सामाजिक कार्यकर्ते निलेश भार्गवे यांनी आज आनंद आश्रम ठाणे येथे शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रसंगी नगरसेवक सुदाम डेमसे, सचिन भोसले, शिवा ताकाटे, योगेश बेलदार, आनंद फरताळे, रोशन शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.