नाशिक, 25 मार्च : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्या उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर ते नाशिकमध्ये बोलत होते. राहुल गांधींना एका प्रकरणात न्यायालयानं दोषी ठरवल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यावरून संजय राऊत यांनी पुन्ह एकदा जोरदार टोला लगावला आहे. लोकशाही नष्ट करण्याचा हा डाव आहे. विरोधकांना नष्ट करण्याचं हे दळभद्री राजकारण सुरू आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत नेमकं काय म्हणाले? लोकशाही नष्ट करण्याचा हा डाव आहे, विरोधकांना नष्ट करण्याचं दळभद्री राजकारण सुरू आहे. आम्ही माफी मागीतली असती तर मी तेव्हा जेलमध्ये गेलो नसतो, मात्र आम्ही दुसरा पर्याय निवडला मान ताठ ठेवली त्यामुळे जेलमध्ये गेलो. राहुल गांधींची देखील तीच भूमिका आहे. त्यांनी माफी मागितली नाही, त्यामुळे त्यांना खासदारकी गमवावी लागली असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तुम्ही ठाकरे नावावर निवडून आला आहात. तुम्ही जर उठाव केल्याचा क्रांती घडवल्याचा दावा करत असाल तर पुन्हा राजीनामे द्या आणि निवडून येऊन दाखवा, असं आव्हान देखील त्यांनी यावेळी शिंदे गटाला केले आहे. ..तेव्ह तुमचीही अवस्था तशीच होईल; राहुल गांधींच्या खासदारकीवरून शेट्टींचा भाजपवर निशाणा ‘मालेगावमधून संपूर्ण राज्यात संदेश जाईल’ उद्या मालेगावामध्ये शिवसेना ठाकरे गटाचेप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेवर देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या या सभेची उत्सुकता फक्त मालेगावमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे. गद्दारी प्रकरण घडल्यानंतर या भागात उद्रेक आहे. सभा ऐकण्यासाठी लाखो लोक उपस्थित राहातील. मालेगावमधून उद्या जो संदेश जाईल तो संपूर्ण राज्यात जाणार आहे. मालेगावमध्ये शिवसेनेचे आमदार निवडून आले होते, मात्र ते पळून गेले. आता मालेगावचे पुढचे आमदार हे अद्वय हिरे असतील, असं म्हणत संजय राऊत यांनी यावेळी दादा भुसे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.