मुंबई, 31 जानेवारी : माथाडी कामगारांच्या शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची निवेदनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊनही प्रश्न मार्गी लागले नाही. त्यामुळे उद्या 1 फेब्रुवारीला माजी आमदार आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे उपोषणाला बसणार आहे. मंत्री दर्जाबद्दल एकनाथ शिंदेंनीच घोषणा केली होती. त्यांचं हे उपोषण सरकारला घरचा अहेर मानला जात आहे. माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या कामगार, गृह, पणन-सहकार, नगरविकास, महसूल व अन्य खात्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे महाराष्ट्र शासन व संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम माथाडी कामगारांचा निषेधार्थ 01 फेब्रुवारी 2023 रोजी नाईलाजास्तव लाक्षणिक संप पुकारला असल्याचे नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी जाहीर केले आहे. (‘वंचित महविकास आघाडीचा..’ प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टचं सांगितलं, पवारांवर पुन्हा निशाणा) माथाडी कामगारांच्या शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची निवेदनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री, संबंधित विभागाचे प्रधान सचिव, कामगार आयुक्त, माथाडी बोर्ड व अन्य संबंधितांकडे सादर केलेली आहेत, यासंदर्भात अनेक वेळा संयुक्त बैठका झाल्या, प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे म्हणून संप, मोर्चे, उपोषणे यासारखी आंदोलनं केली, परंतु माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न तसेच्या तसे पडून असल्याचे नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. दैनिक सकाळच्या वर्धापन दिनानिमित्त रविंद्र नाट्य मंदिर, दादर, मुंबई येथे सकाळ सन्मान पुरस्कार गौरव कार्यक्रमाच्या वेळी देखिल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप पुकारला असल्यासंबंधीचे नोटीस व प्रश्नांचे निवेदन सादर केले आहे. परंतु याबाबत सरकारने गांभिर्याने विचार केलेला नाही, असेही नरेंद्र पाटील म्हणाले. (वाचा - शिवसेनेसाठी अंतिम लढाई? निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाचा मोठा दावा, अखरेच्या क्षणी शिंदेचंही उत्तर ) महाराष्ट्रात ३६ माथाडी मंडळे आहेत, बृहन्मुंबई, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्याकरीता एकूण ११ माथाडी मंडळे असून, या व अन्य मंडळाच्या पुनर्रचना झालेल्या नाहीत, त्यामुळे माथाडी कामगारांचे धोरणात्मक प्रश्न प्रलंबित आहेत, सल्लागार समितीवर अनुभवी कामगार नेत्यांच्या नेमणुका करणे आवश्यक आहे. माथाडी मंडळांना ५० वर्षे झाली, कार्यालयीन सेवेतील अधिकार व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, सध्या माथाडी मंडळामध्ये कर्मचारी नाहीत, त्यामुळे कामगारांची दैनंदिन कामे होत नाहीत, माथाडी कामगारांच्या मुलांना माथाडी मंडळाच्या सेवेत प्राधान्य द्यावे म्हणून सतत मागणी केलेली आहे, त्यावर कार्यवाही होत नाही. गेले अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांची शासन व संबंधितांकडून सोडवणूक केली जात नाही, त्यामुळे तमाम माथाडी कामगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरला असून, कामगारांना नाईलाजाने लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेणे भाग पडत आहे, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.