नागपूर, 20 डिसेंबर : हिवाळी अधिवेशनामध्ये दुसरा दिवसही वादळी ठरला आहे. विधान परिषदेमध्ये जोरदार गोंधळ झाल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण मध्येच थांबवून कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले, त्यामुळे फडणवीस कमालीचे संतापले. विधान परिषदेमध्ये आज शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि आमदार उद्धव ठाकरे हे हजर होते. यावेळी त्यांनी आक्रमकपणे महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या प्रकल्पांवर बाजू मांडली. या मुद्दावर उत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे उभे राहिले. पण विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी विधान परिषद सभापती निलम गोऱ्हे यांनी गोंधळ पाहता 15 मिनिटांसाठी सभागृह तहकूब केलं. सभागृहाचे कामकाज तहकूब केल्यामुळे फडणवीस कमालीचे संतापले. ‘हे बरोबर नाही’ असं म्हणून नाराजी व्यक्त केली. हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही विरोधक सरकारच्या विरोधात अनेक मुद्द्यावरून आक्रमक झाले आहे. 50 खोके एकदम ओके असे बॅनर घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. ‘गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी’ असे बॅनरही घेऊन घोषणाबाजी सुरू केली. (gram panchayat election result : कोल्हापूरच्या कागलमध्ये राष्ट्रवादी-भाजपमध्ये कांटे की टक्कर, आतापर्यंतचा निकाल) त्यानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, प्रताप सरनाईक आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर घोषणाबाजी करण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहिले. यावेळी 50 आमदार एकदम ओके, घरी बसले बोके, असे बॅनर घेऊन घोषणाबाजी केली. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होताा. याच दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा तिथून सभागृहात गेले होते. त्यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी आपली घोषणाबाजी सुरूच ठेवली. (gram panchayat election result :साताऱ्यात राष्ट्रवादी पुन्हा! भाजप-शिंदे गटाला चारली धूळ, शंभुराजे देसाईंना मोठा धक्का) दरम्यान, आज सीमा वादाचा प्रश्न ,शेतकऱ्यांना न मिळालेली मदत या सर्व मुद्द्यांवरती विधानभवनाच्या पायऱ्यावरती विरोधक आंदोलन करतील आणि सभागृहातही आक्रमक राहणार आहेत. सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर तीनही पक्षांची भूमिका कशी असावी या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक झाली. श्रद्धा वालकर प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी लावण्यात आलेली आहे. त्यामुळे श्रद्धा वालकर या विषयासह आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली समिती यावरती विरोधक आक्रमक होणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.