नागपूर, 1 एप्रिल: संजय राऊत यांना बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमकीचा मॅसेज आला आहे. यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. संजय राऊत यांनी त्यांना मिळालेल्या धमकीनंतर सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यावर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना ज्याने धमकी दिली, त्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार त्याने दारूच्या नशेत धमकी दिली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले फडणवीस? संजय राऊत यांना ज्याने धमकी दिली, त्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार त्याने दारूच्या नशेत धमकी दिली आहे. यासंदर्भात संपूर्ण तपास केला जाईल आणि ज्याने कोणी धमकी दिली त्याच्यावर कारवाई होईल. महाराष्ट्रमध्ये कोणी कोणालाही धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाहीत ती व्यक्ती कोणीही असो कारवाई होईल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळेंच्या टीकेला उत्तर संजय राऊत यांना आलेल्या धमकीनंतर सुप्रिया सुळे यांनी गृहविभागावर जोरदार निशाणा साधला होता.सुप्रिया सुळे यांच्या या टीकेला देखील यावेळी फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे, याची मला कल्पना आहे. अनेक लोकांना असं मनातून वाटतंय की मी गृहमंत्री राहिलो नाही, तर बरं होईल. मात्र त्या सर्वांना माझं सांगणं आहे की मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृह विभागाचा प्रभार दिला आहे. त्यामुळे जे जे चुकीचं काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून यापूर्वीही पाच वर्ष मी काम सांभाळलं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.

)







