मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Pench Tiger Project: नागपूर जवळचं वाघाचं घर, 'जंगल बुक'शी आहे खास कनेक्शन! Video

Pench Tiger Project: नागपूर जवळचं वाघाचं घर, 'जंगल बुक'शी आहे खास कनेक्शन! Video

X
विदर्भातील

विदर्भातील पेंच व्याघ्र प्रकल्प पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. रुडयार्ड किपलिंग यांच्या 'द जंगल बुक'शी कनेक्शन असणारा हा प्रकल्प 25 व्या वर्षात पदार्पण करत आहे.

विदर्भातील पेंच व्याघ्र प्रकल्प पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. रुडयार्ड किपलिंग यांच्या 'द जंगल बुक'शी कनेक्शन असणारा हा प्रकल्प 25 व्या वर्षात पदार्पण करत आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Nagpur, India

  विशाल देवकर, प्रतिनिधी

  नागपूर, 24 फेब्रुवारी: राज्यातील एकूण वनक्षेत्रापैकी सुमारे 58 टक्के वनक्षेत्र एकट्या विदर्भात आहे. वनसंपन्नता व जैवविविधतेच्या निमित्ताने निसर्गाचा वरदहस्त विदर्भ भूमीला लाभला आहे. महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी तब्बल पाच व्याघ्र प्रकल्प एकट्या विदर्भात आहेत. नागपूर जिल्हा आणि नागपूर शहराला संलग्न परिघात मोठे विपुल वनक्षेत्र आहे. त्यामुळेच टायगर कॅपिटल ऑफ इंडिया अशी एक वेगळी ओळख नागपूरची आहे.

  पेंच व्याघ्र प्रकल्प वाघाचे घर

  घनदाट जंगलातून वाट काढताना अचानक वाघ समोर यावा, अंगावर रोमांच उभे राहावेत, या देखण्या-रुबाबदार प्राण्याला डोळ्यात साठवून घ्यावं आणि हा थरारक अनुभव गाठीशी घेऊन समृद्ध वनपर्यटनाचा आनंद घेऊन घरी परतावं, असा अनुभव देणारे राज्यातील वाघोबाचे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे 'पेंच व्याघ्र प्रकल्प' होय. भारत सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने 2014-15 मध्ये केलेल्या अभ्यासात राज्यातील व्याघ्र प्रकल्पांना अतिउत्तम असा दर्जा दिला. त्यात पेंच व्याघ्र प्रकल्पाचा देखील समावेश आहे.

  व्याघ्र प्रकल्पाचे 25 व्या वर्षात पदार्पण

  या राखीव क्षेत्रातून उत्तर दक्षिण वाहणाऱ्या जीवनदायिनी पेंच नदीचे नाव या व्याघ्र प्रकल्पाला देण्यात आले आहे. 1975साली महाराष्ट्र शासनाने हे राष्ट्रीय उद्यान घोषित केले आणि 23 फेब्रुवारी 1999 मध्ये याला व्याघ्र प्रकल्पाचा अधिकृत दर्जा मिळाला. या घटनेला 23 फेब्रुवारीला 24 वर्ष पूर्ण होऊन हा व्याघ्र प्रकल्प 25 व्यां वर्षात पदार्पण करत आहे.

  पेंज व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढली

  जंगल म्हटलं की डोळ्यापुढे सर्वप्रथम उभा ठाकणारा प्राणी म्हणजे पट्टेदार वाघ हा होय. सर्वसाधारण 2008-09 च्या आकडेवारी नुसार या कालावधीत पेंच व्याघ्र प्रकल्पात 9 वाघ होते. आज हीच आकडेवारी 50 च्या घरात पोहचली आहे. पेंच वाघाच्या पलीकडे जाऊन विचार केला तर संरक्षण करण्याच्या हेतूने आणि खास करून वाघांच्या संवर्धनासाठी पेंच मध्येच दोन व्याघ्र प्रकल्पाची आखणी केली आहे. ज्यात महाराष्ट्र व्याघ्र प्रकल्प आणि मध्य प्रदेश व्याघ्र प्रकल्प असे भाग आहेत.

  बीडमधील ऐतिहासिक, धार्मिक स्थळांबाबत मोठा निर्णय! Photos

  व्याघ्र प्रकल्पाचे विस्तृत क्षेत्र

  महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या मध्यभागातून पेंच नदी वहात गेली आहे. ज्यामुळे जंगलाचे दोन भाग पडले आहे. व्यवस्थापन आणि कामाच्या सोयीसाठी पूर्व आणि पश्चिम वनपरिक्षेत्र असे दोन भाग आहेत. व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र 257 चौरस किलोमीटर मध्ये पसरले आहे. उंच सखल डोंगररांगांनी भरलेले हे जंगल मध्य भारतातील दख्खनच्या पठारावरील महत्वाचे ठिकाण आहे. येथील डोंगररांगा काही उच्च तर काही लहान आहेत. त्यात संमिश्र वनासोबतच सागवानचे प्रमाण अधिक आहे.

  'द जंगल बुक'शी कनेक्शन

  सुप्रसिद्ध लेखक रुडयार्ड किपलिंग यांना या परिसरातील दाट जंगल आणि तेथे वावरणाऱ्या अद्भुत गोष्टींनी भुरळ पाडली. त्या आधारेच त्यांनी सुप्रसिद्ध 'द जंगल बुक' ची निर्मिती केली. हे पुस्तक जगप्रसिद्ध झाले. त्याचे पेंच कनेक्शन अनेकांना भुरळ घालणारे आहे.

  Agro Tourism : नौका विहार ते ब्रेक डान्स, निसर्गरम्य वातावरणात करा तुमची सुट्टी एन्जॉय Video

  जैविकदृष्ट्या महत्त्व

  पेंचच्या जंगलात सर्वात दुर्मिळ झालेल्या वाघाला सुयोग्य निवारा मिळाला आहे. वनस्पतींची मोठी विविधता, सस्तन प्राणी, पक्षी, कीटक, सरपटणाऱ्या जीवांमुळे येथील वाघांचे भविष्य सुरक्षित झाले आहे असे म्हणता येईल. पेंच व्याघ्र प्रकल्पाला अनेक दृष्ट्या अतिशय महत्व प्राप्त झाले आहे. जैविकदृष्ट्या सोबतच मनोरंजन, पुरातन, सांस्कृतिक तसेच शैक्षणिकदृष्ट्या यांचे महत्व अधोरेखित झाले आहे. या परिसरात राहणाऱ्यांना तसेच येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना या सर्व बाबी उपयोगी ठरल्या आहेत.

  पर्यटकांना भुरळ

  देशातील जुन्या व्याघ्र प्रकल्पापैकी पेंच व्याघ्र प्रकल्प हे एक आहे. महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाने भरारी घेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार पटकाविला आहे. ही बाब महत्त्वपूर्ण मानली जात आहे. वाघासाठी पूरक असे वातावरण या भागात असून संपन्न जैवविविधता येथे लाभली आहे. एकवेळ वाघ जरी दिसला नाही तर येथील आल्हाददायी वातावरण पर्यटकांना भुरळ घालत असते.

  शहाजहानच्या कबरीवर चढवली जगातील सर्वांत लांबीची चादर, वाचा काय आहे खासियत

  कृषी पर्यटन आणि बरंच काही..

  पेंच मध्ये एकूण 7 रेंजेस असून 7 गेट्स आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्या जांगालाविषयी माहितीत अधिक भर पडावी यासाठी अनेक सुख सोयीसह नाविन्य पूर्ण उपक्रम देखील पेंच व्याघ्र प्रकल्पात राबविण्यात येत आहे. त्यात नव्याने विकसित झालेले कोलितमारा गेट येथे अॅग्रो इको टुरिझम, बोटिंग, बैलगाडी जंगल सवारी, माचन स्टे, पारंपरिक कला, असे अनेक मनोरंजनाच्या दृष्टीने उपाय योजना केल्या जात आहेत. आगामी काळात पर्यटनासाठी एक उत्तम पर्याय म्हणून पेंच आदर्श असेल. सोबतच स्थानिकांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान असेल, अशी माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांनी दिली.

  First published:
  top videos

   Tags: Local18, Nagpur, Nagpur News