प्रत्येक जिल्ह्याची ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या खास अशी ओळख असते. तसेच बीड जिल्यातील विविध वास्तू लोकांच्या आकर्षणाचे आणि श्रद्धेचे केंद्र आहेत.
ऐतिसाहिक आणि धार्मिक वास्तूंचे संवर्धन व्हावे यासाठी सरकारी पातळीवरही प्रयत्न होतात. तसेच प्रयत्न स्थानिक नागरिकांनीही करण्याची आवश्यकता असते.
बीड जिल्ह्यातील अनेक वास्तू आजही इतिहासाची साक्ष देत आहेत. या वास्तू पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येत असतात.
अनेक वास्तू या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यासाठी पुरातत्व विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या 42 वास्तूंचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच खासगी संस्थेमार्फत डॉक्युमेंटरी करण्यात येणार आहेत.
पुणे येथील अँगल मीडिया 24 प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी काम करत आहे. नुकतेच जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, माजलगाव, सौताडा अशा ऐतिहासिक स्थानांची माहिती घेतली आहे.
सदर माहितीपटात संबंधित स्थळाची सर्व माहिती संकलित करण्यात येत आहे. ती माहिती व्हिडिओसह पुरातत्व विभागाकडे संग्रहीत करून ठेवण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा जपला जावा यासाठी पुरातत्व विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बीडचे हे वैभव भावी पिढ्यांना व्हिडिओ स्वरुपात उपलब्ध राहणार आहे.