विशाल देवकर, प्रतिनिधी
नागपूर, 23 मे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला यंदा 350 वर्ष पूर्ण होत आहे. दरवर्षी किल्ले रायगड नंतर हा नेत्रदीपक सोहळा उपराजधानी नागपुरात साजरा केला जातो. शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आायोजन केले जाते. याच शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नागपूरसह विदर्भातील समस्त ढोल ताशा पथक एकत्र येऊन शिवरायांना अनोख्या पद्धतीने सामूहिक वादन करून मानवंदना देत असतात. सध्या याच महावादनाचा जोरदार सराव नागपुरातील यशवंत स्टेडियमवर सुरू आहे.
शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने आयोजन
शिवराज्याभिषेक सोहळा हा अन्यायाविरुध्द संपूर्ण रयतेचा स्वातंत्र्य सोहळा होता. म्हणून आज देखील हा उत्सव एखाद्या लोकोत्सवाप्रमाणे मोठ्या उत्साहात देशभर साजरा केला जातो. नागपुरातील महाल भागात असलेल्या शिवतीर्थ येथे शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने दरवर्षी तिथी प्रमाणे हा सोहळा साजरा केला जातो. नागपूरसह विदर्भातील तमाम शिवभक्तांसाठी हा सोहळा एका मोठ्या उत्सवा प्रमाणेच आहे. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी महाल भागात होत असते.
500 हून अधिक वादकांचा समावेश
यंदा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा असल्याने त्याला फार वेगळे महत्त्व आहे. शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने मागील 18 वर्षांपासून अविरतपणे हा उत्सव एका सणाप्रमाणे साजरा केला जातो. यंदा नागपूरसह विदर्भातील तमाम ढोल, ताशा आणि ध्वज पथक यांचे सामूहिक रित्या महावादन होणार आहे. यात सुमारे 35 ढोल ताशा पथकातील सुमारे 500 हून अधिक वादक एकत्र येऊन शिवरायांना मानवंदना देणार आहेत. हे एक दुर्मिळ चित्र शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नागपूरकरांनी या नेत्रदीपक सोहळ्याची याची देही याची डोळा अनुभूती घ्यावी, असे आवाहन शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने समितीचे संयोजक दत्ता शिर्के यांनी केले.
असे असतील कार्यक्रम
रविवार, दि. 28 मे रोजी महाल भागातून भव्य किल्ले मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 5 वाजता शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक महाल नागपूर येथून ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. सोबतच मंगळवार 30 मे रोजी दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड किल्याच्या प्रतिकृतीचे व प्रदर्शनी उद्घाटन होणार असून संध्याकाळी 6.30 वाजता शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक महाल येथे दीपोत्सव संपन्न होणार आहे. मुख्य सोहळा शुक्रवार, दि. 2 जून रोजी होणार असून सकाळी 6 वाजता ढोल ताशांच्या गजरात पालखी, सप्तनद्या जलाभिषेक व दुग्धाभिषेक संपन्न होईल. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माल्यार्पण व 51 सुवासिनींकरवी महाआरती, ढोल-ताशा पथक महावादन, शिवकालीन क्रिडा प्रात्यक्षिक असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chatrapati shivaji maharaj, Local18, Nagpur, Nagpur News