विशाल देवकर, प्रतिनिधी
नागपूर, 23 मे: नागपूर शहराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. ब्रिटिश काळात नागपूरकर भोसले आणि ब्रिटिश यांच्यात सीताबर्डीची लढाई झाली. या ऐतिहासिक लढाईच्या पाऊलखुणा कस्तुरचंद पार्क परिसरात आढळल्या आहेत. ब्रिटिशांनी भोसलेंविरोधात वापरलेल्या तोफा या ठिकाणी आढळल्या असून त्यांनी युद्धाचा इतिहास ताजा केला आहे. आता हाच ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वारसा जपण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयात या तोफा ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे इतिहस प्रेमी, अभ्यासक आणि संशोधकांसाठी याचा फायदा होणार आहे.
कस्तुरचंद पार्क परिसरात आढळल्या तोफा
नागपूर शहरात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. या ऐतिहासिक घटनांच्या अनेक खुणा शहरात दिसत असतात. 2019 मध्ये कस्तुरचंद पार्क परिसरात खोदकाम सुरू होते. तेव्हा या ठिकाणी जुन्या तोफा सापडल्या. यातील काही तोफा लांब पल्ल्याच्या तर काही कमी पल्ल्याच्या आहेत. कस्तुरचंद पार्क परिसर अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असल्याने या तोफा नेमक्या कोणत्या काळातील आहेत? याचा शोध अभ्यासकांनी घेतला.
ब्रिटिश बनावटीच्या तोफा
नागपुरात आढळलेल्या तोफा या ब्रिटिश कालीन असून त्यावर ब्रिटिश सत्तेच्या खुणा आहेत. त्यावर किंग जॉर्ज तिसरा असे ठळक अक्षरात अंकित चिन्ह पाहायला मिळते. या तोफा नागपूरकर भोसले आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या सीताबर्डीच्या युद्धात वापरलेल्या असाव्यात, असा अंदाज अनेक तज्ज्ञ, जाणकार आणि इतिहास अभ्यासक व्यक्त करत आहेत. दरम्यान, 1817-1818 दरम्यान नागपूरकर भोसले आणि ब्रिटिशांमध्ये कस्तुरचंद पार्क परिसरात सीताबर्डीचे युद्ध झाले होते.
तोफांना गतवैभव प्राप्त होणार
2019 मध्ये या ब्रिटिश कालीन तोफा सापडल्या. तेव्ह त्यांची रवानगी नागपुरातील मध्यवर्थी संग्रहालयात करण्यात आली. मात्र, गेल्या 4 वर्षांपासून त्या आहे त्या अवस्थेतच तिथंच पडून होत्या. मराठ्यांच्या इतिहासातील ऐतिहासिक घटनेच्या साक्षीदार असलेल्या तोफांचे संवर्धन व जतन होण्याची गरज होती. त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता. मात्र, कोरोना काळात प्रस्ताव रखडला. अखेर याला यश आले असून या तोफांचे संवर्धन करण्यात येत आहे.
मुंबई जवळील ‘या’ शहराला USA का म्हणतात? कारण वाचून तुम्ही कराल मान्य, VIDEO
मध्यवर्ती संग्रहालयात होणार जतन
ब्रिटिशकालीन तोफांच्या संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यांना गंज चढू नये म्हणून योग्य ती रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच त्यासाठी ब्रिटिश कालीन बनावटीचे तोफगाडे तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी डिझाईन तयार करण्यात आले असून लवरच हे गाडेही तयार होणार आहेत. या तोफगाड्यांवर 6 तोफा ठेवून त्या मध्यवर्थी संग्रहालयातच ठेवण्यात येणार आहेत. तिथे अभ्यासक, संशोधक, इतिहास प्रेमींना तोफा पाहता येतील, अशी माहिती संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक विनायक निट्टूरकर यांनी दिली.
मैदान परिसरात उत्खननाची मागणी
कस्तुरचंद पार्क परिसरात अजूनही इतिहासाचा खजिना गाढला गेल्याची शक्यता आहे. तोफा, बंदुका व इतर मोठा शस्त्रसाठा पोटात दडून असल्याची शक्यताही आहे. त्यामुळे इतिहासातील अनेक स्मृतीनां कवटाळून असलेला हा वारसा काळाच्या ओघात कायमचाच नष्ट होण्यापूर्वी या परिसराचे वैज्ञानिक पध्दतीने उत्खनन व्हावे, अशी भावना इतिहास प्रेमी व्यक्त करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: History, Local18, Nagpur, Nagpur News