नागपूर, 26 डिसेंबर : उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राणाभीमदेवी थाटात नागपुरात आरोपांचे बॉम्ब फोडू असा इशारा दिला होता, त्यामुळे सकाळपासूनच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कोणता बॉम्ब फोडणार? याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु होती. दुपारी बाराच्या सुमारास राऊतांनी अगरबत्ती जोडलेला सुतळी बॉम्बचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला. त्यामुळे ठाकरे-राऊत सत्ताधाऱ्यांविरोधात कोणता बॉम्ब फोडणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली. उद्धव ठाकरे, संजय राऊत विधिमंडळ परिसरात आले. ठाकरेंनी अधिवेशनाच्या कामकाजात सहभाग घेतला. विधानपरिषदेत सीमावादावरुन सरकारवर निशाणाही साधला. त्यानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील विरोधकांच्या आंदोलनातही ठाकरे-राऊत सहभागी झाले. मात्र तिथेही ठाकरे-राऊतांनी कुठलाच आरोपांचा बॉम्ब फोडला नाही. यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी बॉम्ब तयार, वातीही काढल्यात. पेटवण्याचा अवकाश आहे, असं म्हणत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संजय राऊतांचा बॉम्ब फुसका ठरल्याची चर्चा सुरु झालीय.
संजय राऊतांचा बॉम्ब फुसका ठरला? उद्धव ठाकरेंनीही वेळ मारून नेली!#SanjayRaut #UddhavThackeray pic.twitter.com/3FBjkqwTZk
— News18Lokmat (@News18lokmat) December 26, 2022
आदित्य टार्गेट झाल्यावर उद्धव मैदानात हिवाळी अधिवेशनाच्या मागच्या आठवड्यात सत्ताधारी पक्षाकडून आदित्य ठाकरे यांना टार्गेट करण्यात आलं. दिशा सालियान प्रकरणी चौकशीची मागणी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी केली, यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी केली जाईल, अशी घोषणा सभागृहात केली. अधिवेशनात आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं जात असल्यामुळे उद्धव ठाकरेही मैदानात उतरले. उद्धव ठाकरे, संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि युवासेनेचे वरुण सरदेसाई नागपूरमध्ये आले.