नागपूर, 27 मार्च : सध्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषदेमध्ये सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याच वादग्रस्त वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनी रविवारी मालेगावमध्ये झालेल्या सभेत राहुल गांधी यांना सुनावलं आहे. सावरकर आमच्यासाठी कायम वंदनीय आहेत, लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येऊ, मात्र सावरकरांचा आपमान सहन केला जाणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, त्यानंतर सजंय राऊत यांनी देखील ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली आहे.
नाना पटोलेंची प्रतिक्रिया
त्यानंतर सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होऊ शकते, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. आता यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी आपले विचार मांडत आहेत. उद्धव ठाकरे आपले विचार मांडत आहेत, ते दोघेही आपले विचार घेऊन पुढे जात आहेत. भाजपकडून राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली, त्यावरून राहुल गांधींनी सावरकरांचा संदर्भ दिल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
आमची सावरकरांबाबतची भूमिका स्पष्ट, राहुल गांधींची भेट घेणार; राऊतांनी पुन्हा सुनावलं
विचारांशी तडजोड नाही
पुढे बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं की, देशाच्या इतिहासात काँग्रेसचं योगदान आहे. मात्र गेल्या 8 ते 10 वर्षांत काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विपरीत परिस्थितीत आम्ही एकत्र आलो आहोत. कॉमन मिनीमम प्रोग्राममध्ये सावरकर हा विषयच नाही. सर्वधर्म समभावाचा विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. काँग्रेस विचारांशी तडजोड करत नाही, करणार नाही, सत्ता येईल, जाईल पण विचारांशी तडजोड शक्य नसल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Nana Patole, Sanjay raut, Shiv sena, Uddhav Thackeray