मुंबई, 11 डिसेंबर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर-शिर्डी या 521 किमी महामार्गाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात येणार आहे. दरम्यान या सोहळ्यावर पाऊस पाणी फेरण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात झालेल्या मेंडोस चक्रिवादळामुळे विदर्भात पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढचे 4 दिवसा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यक्रमावर पावसाचं सावट राहू शकते. अवघ्या काही तासानंतर पंतप्रधानांच्या हस्ते 55 हजार कोटींचा खर्च असलेला समृद्धी महामार्ग देशाला समर्पित केला जाणार असून प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी केली आहे.
महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट घोगांवत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यात येत्या 3,4 दिवसात काही ठिकाणी गडगडाटासह मध्यम ते हलका पाउस पडण्याची शक्यता आहे. ढगाळ आकाश. तामीळनाडूला धडकलेल्या चक्रीवादळाच्या नंतरच्या प्रभावामुळे अशी स्थितीची शक्यता. - IMD pic.twitter.com/0zanXXGm1L
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 10, 2022
हे ही वाचा : मेंडोस चक्रिवादळाचा महाराष्ट्राला तडाखा, ऐन थंडीत मुंबईसह राज्यात पाऊस बरसणार
तसेच पूर्व विदर्भात देखील उद्या आणि परवा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर देखील पावसांच सावट आहे. विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
असा असेल मोदींचा प्लॅन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये समृद्धी महामार्गच्या पहिल्या टप्प्याचं, मेट्रो प्रकल्प, एम्सच्या लोकार्पणाचा सोहळा संपन्न होणार आहे. तसंच नाग नदी पुनर्जीवन आणि मेट्रो फेस 2 चे भूमिपूजन देखील मोदींच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ९.२५ च्या सुमारास नागपुरात दाखल होणार आहेत. ते कस्तूरचंद पार्क ते खापरी या मार्गावर मेट्रोने प्रवास करणार असून त्यानंतर समृद्धी महामार्गावर १० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी ज्या मार्गानं जाणार आहेत. त्या मार्गावर कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.
हे ही वाचा : राज्यात थंडीचा कडाका वाढला, धुळे धुक्यात बुडाले, तुमच्या शहराचं काय तापमान?
पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान
चालू आर्थिक वर्षात पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला अनेक भागात पाऊसच झाला नाही, त्यामुळे पेरणीला विलंब झाला. पेरणी झाल्यानंतर राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा विदर्भ आणि मराठवाड्याला बसला.
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं. त्यानंतर ऐन हातातोंडाशी घास आला असताना पुन्हा अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. आता अवकाळी पाऊस झाल्यास याचा मोठा फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nagpur News, Rain fall, Rainy season nagpur, Weather forecast, Weather warnings