नागपूर, 3 सप्टेंबर : नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हिंदी सिनेमात ज्याप्रकारे अपहरण करुन लाखो रुपयांची खंडणी मागितली जाते अगदी तसाच प्रकार नागपूरमध्ये बघायला मिळाला. काही आरोपींनी नागपूरमध्ये एका मुख्याध्यापकाचं अपहरण केलं होतं. या मुख्याध्यापकांच्या सुटकेसाठी आरोपींनी तब्बल 30 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पण पोलिसांनी आरोपींना चांगलाच धडा शिकवला. त्यामुळे मुख्याध्यापकाची सुखरुप सुटका झाली. संबंधित घटनेतील पीडित मुख्याध्यापकाचं प्रदीप रमाणी असं नाव आहे. आरोपींनी प्रदीप रमाणी यांचं शुक्रवारी (2 सप्टेंबर) संध्याकाळी नागपूरच्या जरीपटका भागातून अपहरण केलं होतं. त्यामुळे रमाणी घरी पोहोचू शकले नव्हते. रात्री उशिर झाला तरी रमाणी घरी आले नाही म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना फोन लावून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तरीही रमाणी यांच्यासोबत संपर्क होवू शकला नाही. ( महाप्रसादाच्या कार्यक्रमात गोळीबार, गणेशोत्सवाला गालबोट, धक्कादायक घटनेने कोल्हापूर हादरलं ) या दरम्यान आपहरणकर्त्या आरोपींनी शनिवारी सकाळी म्हणजेच आज सकाळी कुटुंबियांना फोन करत 30 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. रमाणी यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत अपहणकर्त्यांना फोनद्वारे चांगलाच दम दिला. पोलिसांनी आरोपींवर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव निर्माण केला. त्यामुळे घाबरलेल्या आरोपींनी प्रदीप रमाणी यांना सोडून दिले. अपहरणकर्त्यांच्या सुटकेतून सुटल्यानंतर प्रदीप रमाणी यांनी थेट जरीपटका पोलीस ठाणे गाठले व वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली असून त्यातील दोन आरोपींना ताब्यात देखील घेतलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.