नागपूर, 16 जानेवारी : नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीमधील मतभेद समोर आले होते. या जागेवर शिवसेना आणि काँग्रेस अशा महाविकास आघाडीमधील दोनही घटक पक्षांनी दावा केला होता. मात्र आता यावर तोडगा काढण्यात यश मिळालं आहे. नागपूरच्या जागेवरील दावा शिवसेना मागे घेणार असून, ही जागा काँग्रेसचा उमेदवार लढवणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे. काल रात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.
काँग्रेस, ठाकरे गट आमने-सामने
नागपुरच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस आमने-सामने आले होते. दोन्ही पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतु आज उमदेवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर काल रात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. या बैठकीत नागपुरची जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र काँग्रेस सुधाकर अडबाले यांना समर्थन देणार की राजेंद्र झाडे यांना समर्थन मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
हेही वाचा : मुश्रीफ यांच्या घरावरील इडीच्या छाप्यानंतर सोमय्या पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
आज पुन्हा बैठक
दरम्यान नागपूर मतदारसंघातील उमेदवाराबाबत कालच्या बैठकीमध्येच निर्णय घेण्यात आला आहे. मात्र तरीदेखील आज पुन्हा एकदा सकाळी 11 वाजता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर महाविकास आघाडीच्या वतीनं अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्यात येणार आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नाशिकमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर आता महाविकास आघाडीकडून सावध पाऊले उचलली जात असल्याचं पहायला मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.