नेहाल भुरे, प्रतिनिधी नागपूर, 3 जुलै : पैसे आणि माणुसकी यांचं मोजमाप केलं तर माणुसकीचं पारडं नेहमी अव्वल ठरेल. पण काही लोक पैशांच्या मृगजळामध्ये अडकतात. त्यांना पैशांची इतकी भुरळ पडते की त्यांच्या राक्षसी महत्त्वकांक्षा भयानक टोक गाठतात. मग या महत्त्वकांक्षामध्ये ते आपल्या जवळचे मित्र, सगे-सोयरे, नात्यातले, रक्ताचं कुणाचाही विचार करत नाही आणि प्रचंड खतरनाक कृत्य करुन बसतात. खरंतर पैशांच्या लोभापाई त्यांच्या मनात विकृती निर्माण झालेली असते आणि ही विकृती जीवघेणी ठरते. भंडारा जिल्ह्यातून अशीच काहिशी घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या चुलत भावाची पैशांच्या लोभापाई गळा चिरुन निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी हत्या करणाऱ्या आरोपीला नागपुरातून बेड्या ठोकल्या आहेत. पण या घटनेमुळे भंडारा जिल्हा हादरला आहे. नागपूरच्या हार्डवेयर व्यापाऱ्याचा गळा चिरून खून (Murder) प्रकरणाचा सुगावा अखेर भंडारा पोलिसांना (Bhandara Police) लागला आहे. व्यापारात सोबत घेतलेल्या चुलत भावानेच नागपूरच्या व्यापाऱ्याचा गळा चिरून खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. भंडारा पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपी चुलत भावाला नागपूर (Nagpur) येथून जेरबंद केलं आहे. संदेश राजेंद्र क्षीरसागर (वय 24) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ( …आणि कार्यकर्त्याच्या लग्नात दानवे बनले मामा, हाती घेतला अंतरपाट ) मृतक अनिकेश पंजाबराव क्षीरसागर (वय 49) यांचा भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील लेंडेझरी जंगलातील नेरला ते इटगाव मार्गावर गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपास सुरु केला होता. पोलिसांकडून तांत्रिक कौशल्याचा वापर करून तपास सुरू झाला. अड्याळ येथील एका दुकानात मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून अनिकेशचा चुलतभाऊ संदेश क्षीरसागर याच्याशी संपर्क साधला. तेव्हा तो एकटाच ब्रम्हपुरी येथे असल्याचे सांगितले. मात्र त्याच्या संभाषणात फरक जाणवत असल्याने लक्षात आल्याने त्यावरून पोलिसांनी त्याला नागपूर येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. अनिकेश याला जंगलात जेवणाची आवड होती. त्यामुळे कुठेही बाहेरगावी जायचे असल्यास तो सोबत डब्बा घायचा. जंगलात चांगली जागा पाहून त्या ठिकाणी जेवण करायचा. घटनेच्या दिवशीही तो आपला चुलत भाऊ संदेश सोबत कारने डब्बा घेऊन निघाला होता. इटगाव जंगलात रस्त्यावर कार उभी करून अनिकेश आणि संदेश दोघेही जेवायला बसले. डब्यातील तेलाचे डाग पुसण्यासाठी झाडाची पाने आणतो असे सांगून संदेश थोडा दूर गेला. काही वेळात त्याने आपल्या बॅगमधील शस्त्र काढून अनिकेशचा गळा चिरला, अशी कबुली आरोपीने दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून नात्यातील लोकच पैशांसाठी जीवावर उठल्याचे या घटनेने समोर आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.