विशाल देवकर, प्रतिनिधी
नागपूर, 27 मार्च: दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर कोणताही माणूस अचाट कामगिरी करू शकतो. विदर्भातील दिव्यांग तरुणाने एक हात आणि एक पाय नसतानाही जगाला हेवा वाटेल अशी कामगिरी केली आहे. अकोटच्या धीरज कळसाईत या 24 वर्षीय तरुणाने श्रीनगर ते कन्याकुमारी हे 3651 किलोमीटरचे अंतर केवळ 13 दिवसांत सायकलवर पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे अनेक साहसी मोहिमांत भाग घेणाऱ्या धीरजने जगभरातील अनेक अवघड शिखरे सर केली आहेत.
घरची हालाखिची परिस्थिती
धीरज कळसाईत हा विदर्भातील अकोट येथीर रहिवासी आहे. जन्मताच त्याला डावा हात नव्हता. आई-वडील मोलमजुरी करून घरचा कारभार चालवतात. अशा हालाखिचच्या परिस्थितीत त्याने बारावीचे शिक्षण विज्ञान शाखेतून पूर्ण केले. त्यानंतर धीरजचा इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी नंबर लागला. परंतु, पैशाअभावी त्याला शिक्षण पूर्ण करता आले नाही. तर एका अपघातात त्याचा डावा पायही गेला.
दिव्यंगत्वावर जिद्दीने मात
धीरजला जन्मापासून मनगटाजवळून डावा हात नाही. तरीही त्याला गिर्यारोहनासारख्या क्षेत्राची आवड निर्माण झाली. तो आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या बळावर गिर्यारोहन करायचा. अशातच एक अपघात झाला आणि त्याचा डावा पायही निकामी झाला. मात्र, धीरजने हिंमत सोडली नाही तसेच तो नशिाबाला दोषही देत बसला नाही. त्याने आपला छंद जोपासण्याचा निर्णय घेतला आणि गिर्यारोहन सुरूच ठेवले.
शिवराय आदर्श म्हणून सर केले किल्ले
धीरज हा छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो. त्यामुळे कितीही संकटे आली तर त्यांना जिद्दीने सामोरे जाण्याचा निश्चय त्याने केला. दिव्यंगत्वावर मात करत त्याने महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ले सर केले. तसेच काही अवघड शिखरेही सर केली.
Success Story: 2 वेळेस PSI पद हुकलं, नाश्ता सेंटरमधून करतो लाखोंची कमाई, Video
अनेक साहसी मोहिमांत यशस्वी कामगिरी
धीरजने अनेक साहसी मोहिमांत भाग घेतला. महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखर व इतर गड किल्ले सर केले. तसेच आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक म्हणून त्याने 2019 साली रशियामधील माउंट एल्बूज व दक्षिण आफ्रिकेतील किलीमंजारो हे हिमशिखर सर करून तिरंगा फडकवला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉड व महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
सायकलिंग मध्ये जागतिक पराक्रम
धीरजला श्रीनगर ते कन्याकुमारी सायकल प्रवास मोहिमेबाबत माहिती मिळाली. त्याने हा विक्रम करण्याचा निश्चय केला आणि श्रीनगर ते कन्याकुमारी रेस अक्रॉस इंडिया या आशियातील सर्वात लांब अंतराच्या स्पर्धेत त्याने जागतिक विक्रम केला. श्रीनगरच्या लाल चौकातून 1 मार्च रोजी तो कन्याकुमारीकडे जाण्यासाठी रवाना झाला. अवघ्या 13 दिवसांत त्याने 12 राज्ये व महत्त्वाच्या 25 शहरांतून प्रवास करत कन्याकुमारी गाठले. यासाठी त्याने दररोज 300 किलोमीटर प्रवास केला.
वय वर्ष 3, रात्री झोपेत असतानाच बापाने केला अॅसिड हल्ला, पण तिच्या जिद्दीला खरंच सलाम!
गिनिज बुकमध्ये होणार नोंद
धीरजने दिव्यांग असूनही श्रीनगर ते कन्याकुमारी 3651 किलोमीटर अंतर 13 दिवसांत पूर्ण केले. हा जागतिक विक्रम ठरला असून या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे धीरजने सांगितले.
ऑलिम्पिकमध्ये मेडलचे स्वप्न
धीरजने अनेक संकटांवर मात करत मोठी कामगिरी केली आहे. आता लोकांचे पाठबळ मिळत असल्याने पुन्हा सीईटी देऊन इंजिनिअरिंग पूर्ण करावयाचे आहे. तसेच पॅरा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊन देशासाठी पदक मिळवायचे आहे, असे धीरजने सांगतिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Handicapped legs, Local18, Nagpur, Nagpur News, Success story