नागपूर, 5 जुलै : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज नागपुरात (Nagpur) पत्रकार परिषदेत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री बनवण्याबाबतचा निर्णय हा आपल्या प्रस्तावानंतर घेतला गेल्याची माहिती दिली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याबाबतचा प्रस्ताव मी नेला. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे, असा प्रस्ताव मी दिला होता. तो प्रस्ताव पक्षाच्या वरिष्ठांनी मान्य केला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आमच्यासोबत 115 आमदार होते. त्यामुळे आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं. पण आमच्या पक्षाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, असंदेखील फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? ‘‘मला अतिशय आनंद आहे की आमच्या पक्षाने हा निर्णय घेतला की, आम्ही सत्तेचे हापापलेले नाहीयेत. आम्ही आग्रह धरला असता तर मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळालं असतं. आमच्यासोबत 115 आमदार होते. पण आमच्या पक्षाने सांगितलं की, आमचा आग्रह आणि दु:ख हेच आहे की, आम्हाला मिळालेला मायडेंट चोरुन नेलं गेलं. म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा भाजप पक्षाने घेतला. आमचे नेते नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे पी नड्डा यांनी माझ्या संमतीने हा निर्णय घेतला’’, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. ‘‘खरतंर असं म्हणणं चुकीचं होणार नाही की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याबाबतचा प्रस्ताव मी नेला. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे, असा प्रस्ताव मी दिला होता. तो प्रस्ताव पक्षाच्या वरिष्ठांनी मान्य केला. फक्त त्यावेळी मी बाहेर राहीन, असंच ठरलं होतं. मात्र ज्यावेळी राज्यपालांना पत्र देवून पत्रकार परिषद झाली ती करुन मी घरी गेलो त्यावेळी नड्डा यांनी मला आधी फोन करुन सांगितलं की, आमचा असा विचार आहे. अमित शाह बोलले. त्यानंतर माझी तयारी त्यावेळी नव्हती. कारण त्यावेळेस मी मानसिकताही केली होती की, आपण बाहेर राहून या सरकारला मदत केली पाहिजे’’’, असं फडणवीस म्हणाले. ( प्रसिद्ध ज्योतिषी चंद्रशेखर यांची हत्या, शिष्याच्या वेशात आलेल्या दोघांनी केले 70 हून अधिक वार ) ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांची सर्वांची इच्छा होती की सरकार बाहेर राहून चालत नाही. ते योग्य नाही. सरकार चालवायचं असेल तर सरकारमध्ये राहावं लागेल. त्यामुळे वरिष्ठांच्यांच्या आज्ञेचं पालन करत मी निर्णय बदलला आणि मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याचा मला कुठलाही कमीपणा नाही’’, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. ‘‘एकनाथ शिंदे माझे सहकारी आहेत. आम्ही सोबत काम केलं आहे. आज ते लिडर आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय. माझं संपूर्ण सहकार्य त्यांना असणार आहे. ते मुख्यमंत्री म्हणून यशस्वी झालेच पाहिजे. ते होतीलच कारण त्यांच्यात तसे गुण आहेत. पण याकरता मी माझं योगदान सर्वात जास्त देणार आहे. आम्ही दोघं मिळून महाराष्ट्राची जी गाडी पटरीवरुन उतरवली आहे ती पुन्हा पटरीवर आणू आणि महाराष्ट्र एक नंबरला आणू’’, असं फडणवीस म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.