नागपूर, 13 एप्रिल : नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. मात्र ही सभा पूर्वीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सुरुवातीला या सभेला भाजपने विरोध केला होता. मात्र आता या सभेविरोधात स्थानिक नागरिक देखील रस्त्यावर उतरले आहेत. महाविकास आघाडीच्या नागपुरातील दर्शन कॉलनीमध्ये होणाऱ्या वज्रमूठ सभेला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. ज्या मैदानावर ही सभा होणार आहे. त्या मैदानावर ही सभा होऊ नये यासाठी स्थानिकांनी अनोखं आंदोलन सुरू केलं आहे. स्थानिक नागरिकांचा विरोध महाविकास आघाडीच्या नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानात होणाऱ्या वज्रमूठ सभेला स्थानिक नागरिकांचा विरोध कायम आहे. दर्शन कॉलनीच्या ज्या मैदानावर ही सभा होणार आहे त्या मैदानावर सभा होऊ नये, म्हणून आज स्थानिक नागरिकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं. हे मैदान खेळण्यासाठी आरक्षित असून तिथे खेळणाऱ्या मुलांच्या समर्थनार्थ स्थानिक नागरिकांनी खेळाडूंसोबत खेळत या मैदानावर होणाऱ्या सभेला विरोध केला आहे. भाजपचे माजी नगरसेवक देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. या मैदानात वज्रमूठ सभा होऊ नये, अशी मागणी नागरिकांनी केली.
बावनकुळेंचा इशारा दरम्यान भाजपने सुरुवातीला हे खेळाचे मैदान असल्यामुळे या मैदानावर सभा घेऊ नये अशी भूमिका घेतली होती. मात्र आता या सभेला विरोध नसल्याचं भाजपच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. परंतु या सभेत पक्षाच्या धोरणावर बोलावे, राज्याच्या धोरणावर बोलावे, वयक्तिक टीका सहन केली जाणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. न्यायालयाच्या निकालानंतरही स्थानिकांचा विरोध कायम आहे.