मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तो शब्द कोणी फिरवला? शिवसेनेचा अमित शहांना रोखठोक सवाल

तो शब्द कोणी फिरवला? शिवसेनेचा अमित शहांना रोखठोक सवाल

2014 साली शिवसेनेने दोन जागांवरून भाजपशी असलेली युती तोडली असा ठपका शहा ठेवतात. मग 25 वर्षांची दोस्ती टिकविण्यासाठी भाजप दोन पावले (जागा) मागे का गेली नाही?

2014 साली शिवसेनेने दोन जागांवरून भाजपशी असलेली युती तोडली असा ठपका शहा ठेवतात. मग 25 वर्षांची दोस्ती टिकविण्यासाठी भाजप दोन पावले (जागा) मागे का गेली नाही?

2014 साली शिवसेनेने दोन जागांवरून भाजपशी असलेली युती तोडली असा ठपका शहा ठेवतात. मग 25 वर्षांची दोस्ती टिकविण्यासाठी भाजप दोन पावले (जागा) मागे का गेली नाही?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

मुंबई, 11 सप्टेंबर : अमित शहा (amit shah) यांना त्यांचे राजकारण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोकशाहीने हा अधिकार सर्वांना दिला; पण भाजप व त्यांचे नेते लोकशाही मार्गाने जात आहेत काय? मग, शिवसेना फोडली कशासाठी? असा सवाल करत शिवसेनेनं अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. तसंच, अमित शहा ‘मातोश्री’वर आले होते व त्यांच्या समोर सत्तेचे वाटप समसमान झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी मीडियासमोर जाहीर केले होते. त्याच वेळी अमित शहांनी फडणवीस यांना थांबवले असते तर बरेच झाले असते, असा टोलाही सेनेनं लगावला.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने अमित शहा यांच्या दौऱ्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून पुन्हा एकदा भाजपवर सेनेनं टीकास्त्र सोडले आहे.

सध्या शिवसेना व ठाकरे घराण्याची अप्रतिष्ठा करण्याची शर्यत लागली आहे. उद्धव ठाकरे व शिवसेना यांच्याविरुद्ध कोणताही माल खपवायचा हा धंदा सुरू झाला आहे. शिवसेनेला गाडून मुंबईवर ताबा मिळविण्याची हीच संधी आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ‘उद्धव ठाकरे यांनी भाजपला धोका दिला व त्याची शिक्षा त्यांना मिळायला हवी. भाजप शिंदे यांच्या गटाबरोबर आहे व राहील. उद्धव ठाकरे यांना आता संपवायलाच हवे.’ अमित शहा यांना त्यांचे राजकारण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोकशाहीने हा अधिकार सर्वांना दिला; पण भाजप व त्यांचे नेते लोकशाही मार्गाने जात आहेत काय? हा प्रश्न आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ अस्थिर करून देशाचे नियंत्रण काही मंडळींनी हातात घेतले आहे. त्यांनी एका बाजूला ‘मिशन मुंबई’ तर दुसऱ्या बाजूला ‘मिशन बारामती’चे षड्डू ठोकले आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व पूर्णपणे खत्म करायचे व तोतयांच्या हाती हे राज्य सोपवायचे, मुंबईचा सरळ घास गिळायचा असा हा कट शिजला आहे. अमित शहा यांनी ते स्पष्टपणे बोलून दाखवले, अशी टीका शिवसेनेनं केली.

(Video : ती 5 मिनिटं खूप ओझं होतं, मोदींच्या चार शब्दांनंतर मात्र...फडणवीसांनी शेअर केला तो किस्सा)

अमित शहा व भाजपचे ‘मिशन मुंबई’ काय आहे त्याचा भयंकर चेहरा उघडा पडला. 2014 साली शिवसेनेने दोन जागांवरून भाजपशी असलेली युती तोडली असा ठपका शहा ठेवतात. मग 25 वर्षांची दोस्ती टिकविण्यासाठी भाजप दोन पावले (जागा) मागे का गेली नाही? बरं, पुढे शिवसेनेबरोबरच सरकार स्थापन झाले. शिवसेनेने लोकसभेत एकत्र यावे म्हणून अमित शहा ‘मातोश्री’वर आले होते व त्यांच्या समोर सत्तेचे वाटप समसमान झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी मीडियासमोर जाहीर केले होते. त्याच वेळी अमित शहांनी फडणवीस यांना थांबवले असते तर बरेच झाले असते. म्हणजे धोका कोणी कोणास दिला यावर आजचे साक्षीपुरावे करण्याची वेळच आली नसती, असा टोलाही शिवसेनेनं भाजपला लगावला.

2014नंतर अमित शहा यांनी शिवसेना व ठाकरेंवर अनेक विखारी हल्ले केले. ‘शिवसेना को पटक देंगे’ अशी भाषा वापरली, पण एकनाथ शिंदे यांनी त्या वक्तव्याचा साधा निषेधही केला नव्हता. शिवसेनेचे अनेक नेते व प्रवक्ते ‘पटक देंगे’वर तुटून पडले होते तेव्हा शिंदे यांचा स्वाभिमान, अभिमान, हिंदुत्व बर्फाच्या गोळय़ाप्रमाणे विरघळून गेले. तेव्हाही अमित शहा शिवसेना गाडायला निघाले होते व आजही त्यांचे तेच स्वप्न आहे. दोन्ही वेळेस शिंदे हे अमितभाईंचे हस्तक म्हणूनच काम करीत होते आणि स्वतःची कातडी वाचवत होते असेच दिसते. आता तर ते उघडपणे ‘पटक देंगे’ धोरणाचे पुरस्कर्ते आहेत. कारण नाहीतर भाजप त्यांना ‘ईडी’ नामक हत्तीच्या सोंडेत घालून पटक देईल, अमित शहा शिवसेनेला जमिनीत गाडण्याची भाषा करतात आणि शिंदे व त्यांचे ‘स्वाभिमानी’ लोक टाळय़ा वाजवतात. महाराष्ट्रावर मोगल चाल करून आले तेव्हा येथील काही लोक शिवरायांना साथ देण्याऐवजी मोगलांना रसद पुरवत होते. शिंदे गटाच्या रूपाने तेच आता घडत आहे, असे दिसते, असा सणसणीत टोलाही शिवसेनेनं शिंदे गटाला लगावला आहे.

(40 खंजीर पाठीत खुपसल्यानंतर आणखी कसली भीती वाटणार? आदित्य ठाकरेंनी आठवला तो भयंकर दिवस)

शिंदे गटाच्या मदतीने मुंबई जिंकू, मुंबईवरील महाराष्ट्राचा आणि मराठी अस्मितेचा ठसा नष्ट करू याच मिशनसाठी अमित शहा मुंबईत आले. शिवसेनेची काही माणसे त्यांनी विकत घेतली, पण जनमत कसे विकत घेणार? शिंद्यांचे लोकही बाळासाहेबांना मानतात. जगात कोणीच अमर नाही. उद्या ‘वर’ गेल्यावर बाळासाहेबांना काय सांगणार? मुंबईचा सौदा करून भाजपच्या ‘मिशन मुंबई’ला रसद पुरवून आम्ही मोठीच मर्दानगी केलीय, असे सांगणार आहेत का? असा सवालही सेनेनं शिंदे गटाला विचारला.

शिवसेना संपवू अशी भाषा करणाऱ्या पटेलांची ‘तिरडी’च बांधू असे आव्हान तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी दिले. त्याच शिवसेनेचा वंश आज सर्वत्र आहे. शिंदे गट म्हणून मिरवणाऱ्यांना हे सत्त्व काय समजणार? अमित शहांच्या या महाराष्ट्रद्रोही वक्तव्यावरच शिंदे गटात बंड व्हायला हवे, पण लाचार आणि बेइमानांकडून स्वाभिमानाची अपेक्षा कशी करायची? अमित शहा म्हणतात, महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता. हा खुलासा त्यांनी अडीच वर्षांनंतर केला, पण समान सत्तावाटपाचे ठरलेच होते. तो शब्द कोणी फिरवला? शिंदे गट हा साबणाचा बुडबुडा आहे. शेवटी जेथे ठाकरे तिकडे शिवसेना हेच लोक मान्य करतील, अशी विचारणाही सेनेनं केली.

'केंद्रातले ‘यूपीए’ सरकार मोदी व अमित शहांच्या मागे हात धुऊन लागले असताना मोदी व पवारांतील सुसंवादामुळेच अमित शहा यांना गोध्रा हत्याकांडातील एका प्रकरणात जामिनावर मुक्त होण्यास मदत झाली. हा गौप्यस्फोट नसून सत्य आहे. आणखी एका प्रकरणात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सरकार’ पद्धतीने भूमिका करून अमित शहा यांना त्या काळात मदत होईल अशी व्यवस्था केली. या दोन्ही प्रसंगांवर स्वतंत्र लिखाण संजय राऊतच करू शकतील. शरद पवार आणि उद्धव ठाकरे बोलू शकतील; पण त्याच ठाकरे-पवारांविरुद्ध टोकाचे मिशन आज अमित शहा व त्यांचे लोक चालवीत आहेत. राजकारणात व लोकशाहीत मतभेदांना जागा आहे. निवडणुकीच्या माध्यमांतून पराभव करणे व तसे बोलणे हे चुकीचे नाही, पण भाजपास शिवसेना फुटल्याबद्दल आनंदाचे भरते आले आहे. शिंदे गटास बेकायदेशीरपणे राजसिंहासनावर बसवून त्यांनी ईप्सित साध्य केले. त्यांचे हास्य विकट आहे, अशी आठवणच सेनेनं शहांना करून दिली.

First published: