मुंबई, 19 ऑगस्ट : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी (Vinod Kambli) सध्या हलाखीचे जीवन जगत असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईसारख्या ठिकाणी घर चालवणंही त्याच्यासाठी फार कठीण झालं आहे. त्यामुळे विनोद कांबळी हा आता नोकरीच्या शोधात असल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी चांगलेच चर्चेत होते. त्यावर आता विनोद कांबळीच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्याला एका मराठी उद्योजकाने नोकरीची ऑफर दिली आहे.
विनोद कांबळी आर्थिक अडचणीत असल्याचे समजल्यानंतर अहमदनगरमधील एका मराठी उद्योजकाने विनोद कांबळीला नोकरी देण्याची तयारी दर्शवली आहे. उद्योजक संदीप थोरात यांनी विनोद कांबळीला सह्याद्री उद्योगसमूहाच्या फायनान्स कंपनीमध्ये नोकरीची ऑफर दिली आहे.
पगार पण सांगितला -
संदीप थोरात यांनी या नोकरीसाठी पगार किती असेल, हे सुद्धा सांगितले आहे. माझ्या फायनान्स कंपनीच्या मुंबईमध्ये 10 शाखा तयार होत आहेत. विनोद कांबळी हे फायनान्सशी संबंधित नसले तरी क्रिकेट हा असा विषय आहे की, त्यात मायक्रो मॅनेजमेंट करावे लागते. याच मायक्रो मॅनेजमेंटचा वापर या शाखांच्या व्यवस्थापनासाठी करता येईल. क्रिकेटमध्ये ज्या शिस्तीने काम चालते तीच शिस्त ते या कंपनीमध्ये लावू शकतात, असे मला वाटते. म्हणून मी त्यांना एक लाख रुपये पगाराची ऑफर मुंबईमध्ये करत आहे, असे थोरात यांनी सांगितले.
हे आपले अपयश -
महाराष्ट्रात खूप चांगल्या व्यक्ती आहेत, मात्र त्यांच्या वार्धक्याच्या काळात त्यांच्यावर ही वेळ का येते हे कळत नाही. सिंधुताई सपकाळांच्या बाबतीतही तसंच झालं, त्यांना संपूर्ण आयुष्य लोकांसमोर पदर पसरुन जगावे लागले. तीच वेळ आता विनोद कांबळींवर आल्याचे दिसत आहे. 1990 ते 2000 या कालावधीमध्ये विनोद कांबळींनी क्रिकेट खेळात चांगली कामगिरी करुन भारताचे नाव एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले. मात्र, त्या व्यक्तीला कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी ओढाताण करावी लागत असेल तर मला वाटते की हे आपले अपयश आहे, असे थोरात एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
हे वाचा - कोट्यवधीचा मालक विनोद कांबळी आला रस्त्यावर, दिवसाची कमाई फक्त 1000 रुपये!
विनोदची क्रिकेट कारकीर्द
दरम्यान, विनोदनं आपल्या कारकीर्दीची सुरुवात शालेय वयापासून केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्यानं हॅरिस शिल्डमध्ये केलेला 664 धावांच्या भागीदारीचा विक्रम आजही अबाधित आहे. विनोदनं भारताकडून 17 कसोटी आणि 104 वन डे सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. 2000 साली विनोदनं आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
हेही वाचा - KKR: आता आयपीएलमध्येही भरणार पंडित गुरुजींची शाळा, चंद्रकांत पंडित केकेआरचे नवे प्रशिक्षक
युवा क्रिकेटपटूंना जागतिक स्तरावरच्या प्रशिक्षण सुविधा पुरवण्यासाठी सचिन तेंडुलकर ग्लोबल क्रिकेट अकादमीची 2019 साली स्थापना झाली होती. सचिनच्या या अकादमीत विनोद कांबळीकडे प्रशिक्षकपद सोपवण्यात आलं होतं.त्यासाठी कांबळीनं सचिनचे आभार मानले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Vinod kambli