मुंबई, 17 ऑगस्ट: भारताचे माजी कसोटीवीर चंद्रकांत पंडित यांची आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केकेआरनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन नुकतीच याची माहिती दिली.
🚨 We have a new HEAD COACH!
— KolkataKnightRiders (@KKRiders) August 17, 2022
Welcome to the Knight Riders Family, Chandrakant Pandit 💜👏🏻 pic.twitter.com/Eofkz1zk6a
आयपीलच्या आगामी मोसमात चंद्रकांत पंडित केकेआरचे माजी मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमची जागा घेतील. रणजी ते आयपीएल… रणजी करंडकात एक यशस्वी प्रशिक्षक म्हणून चंद्रकांत पंडित यांची ख्याती आहे. गेल्या सहा रणजी मोसमात चंद्रकांत पंडित यांच्या संघानं चार रणजी स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यात 2015 साली मुंबई, 2017 आणि 2018 साली विदर्भ आणि 2022 साली मध्य प्रदेशनं रणजी करंडक जिंकला. या तिन्ही संघांच्या यशामागे पंडित गुरुजींचं मोलाचं योगदान होतं. महत्वाची बाब ही की विदर्भ आणि मध्य प्रदेशला रणजीच्या आजवरच्या इतिहासात चंद्रकांत पंडितांनी पहिल्यांदाच विजेतेपद मिळवून दिलं होतं. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये रुळलेले पंडित आयपीएलच्या झगमगाटापासून मात्र दूर होते. पण दोन वेळच्या आयपीएल विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सनं पंडित यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सोपवली आहे. ब्रेंडन मॅक्युलमच्या जागी पंडित न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम गेल्या दोन मोसमात केकेआरच्या प्रशिक्षकपदी होता. पण मॅक्युलम सध्या इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदी आहे. त्यामुळे आगामी आयपीएलसाठी केकेआर फ्रँचायझी प्रशिक्षकाच्या शोधात होती. केकेआरनं प्रशिक्षकपदाची हीच माळ आता चंद्रकांत पंडित यांच्या गळ्यात टाकली आहे. केकेआरकडून स्वागत दरम्यान केकेआरचे सीईओ वेंकी मैसूर यांनी केकेआर परिवारात पंडित यांचं स्वागत केलंय. “आगामी आयपीएलमध्ये आमचं नेतृत्व करण्यासाठी चंदू पंडित केकेआर परिवारात सामील होत आहेत. आम्ही कर्णधार श्रेयस अय्यर आणि पंडित मिळून चांगली कामगिरी करतील अशी आशा करतो.” असं वेंकी यांनी म्हटलंय.