मुंबई, 20 सप्टेंबर : शिंदे गट आणि शिवसेना यांच्या वाद दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातील आरोपांपर्यंत असलेला वाद आता रस्त्यावरच्या लढाईत रुपांतरीत होताना दिसत आहे. अशातच आता शिवसेनेचा उद्या मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच शिवसैनिकांना मेळाव्याच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे पक्षाची आगामी भूमिका कशी असेल? शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याकडे राज्याचं लक्ष शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला अजून अधिकृत परवानगी मिळालेली नाहीये. त्यामुळे राज्यातील राजकारणही तापलंय. शिवसेनेचे नेते संजय राऊत सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. वेदांत आणि फॅाक्सकॅान सारख्या मल्टी नॅशनल कॅपन्या राज्याबाहेर गेल्यात. त्यावरूनही सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असे आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. सत्तांतरानंतर खरी शिवसेना कोणाची? हा प्रश्नं न्यायप्रविष्ठ आहे. अशा सर्व राजकीय प्रश्नांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलंय. एकनाथ शिंदेंनी वाढवला सस्पेन्स! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात झालेल्या जाहीर सभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केलं आहे. हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, 200 क्रॉस झाले तरी आश्चर्य वाटायला नको, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी भविष्यात महाराष्ट्रात काय होणार आहे, याबाबतचा सस्पेन्स वाढवला आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. वाचा - दसऱ्याआधी ‘दुर्गाडी’चा संघर्ष, शिंदे-ठाकरेंच्या वादात कोण मारणार बाजी? ‘मला इतकं प्रेम दिलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार. रस्त्याच्या दुतर्फा असलेले लोक बघून आमचा निर्णय चुकला का बरोबर आहे, हे तुम्हीच सांगा. काल ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपला मोठं यश मिळालं. ज्यांनी आम्हाला अडीच वर्ष घरी बसवलं त्यांना लोकांनी घरी बसवलं,’ असं टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला. शिवाजी पार्कवर कुणाला परवानगी? दुसरीकडे शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी कुणाला मिळणार, याचा पेच अजूनही कायम आहे. ठाकरे गटाकडून दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे, पण बीएमसीने याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. बीएमसीला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाकडून अर्ज आले आहेत, या अर्जांबाबत 22 सप्टेंबरपर्यंत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.