कल्याण, 20 सप्टेंबर : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार, यावरून सध्या शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आहेत. दसरा मेळाव्याचा वाद सुरू असतानाच कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या नवरात्रोत्सवावरून वाद पेटण्याची शक्यता आहे. दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे. दोन्हीही गटाकडून जिल्हाधिकाऱ्यांना परवानगीसाठी अर्ज देण्यात आला आहे. दुर्गाडीच्या ऐतिहासिक नवरात्रोत्सवाला आता जिल्हाधिकारी कोणाला परवानगी देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शिवाजी पार्कवर कुणाला परवानगी? दुसरीकडे शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी कुणाला मिळणार, याचा पेच अजूनही कायम आहे. ठाकरे गटाकडून दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे, पण बीएमसीने याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. बीएमसीला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाकडून अर्ज आले आहेत, या अर्जांबाबत 22 सप्टेंबरपर्यंत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे कोणालाच यंदा शिवाजी पार्कवर परवानगी देण्यात येऊ नये, असं मत पालिका अधिकाऱ्यांनी मांडल्याची माहितीही समोर आली आहे.