मुंबई, 29 ऑक्टोबर : ‘मुख्यमंत्री एकीकडे 30 लाख शेतकऱ्यांना चार हजार कोटींची मदत दिली असे ‘बुडबुडे’ सोडत आहेत तर तिकडे उद्ध्वस्त शेतकरी ‘मदत देता का, मदत?’ असा टाहो सरकारकडे फोडीत आहे आणि राज्याचे कृषीमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना ‘तुम्ही दारू घेता का, दारू?’ असा प्रश्न करीत आहेत. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या घरचे दिवे अजूनही विझलेलेच का आहेत, याचे उत्तर कृषीमंत्र्यांच्या या प्रश्नात दडलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषेतील हा ‘सकारात्मक’ बदल राज्यात घडत आहे तो मिंध्यांनी तीन महिन्यांपूर्वी सामना जिंकल्यामुळेच’ असं म्हणत शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले पिक पाण्यात गेले आहे. राज्य सरकारकडून अजूनही ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला नाही. याच मुद्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून टीका करण्यात आली आहे. (25 पैशांच्या नाण्यावर राणेंचा फोटो, भाजप आक्रमक, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल) ‘गेल्या 75 वर्षांत हा थाटमाट देशाने कधीच पाहिला नव्हता, पण हे सर्व घडू शकले ते दिल्लीत पंतप्रधान मोदी व महाराष्ट्रात मिंधे व फडणवीसांचे सरकार असल्यामुळेच. महाराष्ट्रातील राजकीय ‘सामना’ मिंधे गटाने म्हणे तीन महिन्यांपूर्वी जिंकला. पुन्हा सामना अद्यापि सुरूच असल्याने या दिवाळीत वेगवेगळ्य़ा तलावांवर भल्या पहाटेच ‘सोन्याचा धूर’ निघाला. द्वारका जशी श्रीकृष्णामुळे एका क्षणात सोन्याची झाली, तशी महाराष्ट्रातही लोकांच्या घराघरांवर मिंधे-फडणवीस सरकारमुळे सोन्याची कौले चढली. लक्ष्मीपूजनही थाटामाटात झाले. मिंधे गटाने जो सामना तीन महिन्यांपूर्वी जिंकला त्या गटातील खेळाडू अचानक कुबेर बनले. ‘आनंदाचा सुवर्ण शिधा’ खरेदी करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले व महाराष्ट्र झळाळून निघाला. हे सर्व मिंधे-फडणवीस सरकारमुळेच घडले, अशी टीका सामनातून करण्यात आली. ( मुस्लिमबहुल इंडोनेशियन नोटांवर लक्ष्मी-गणेश, मग इथं का नाही? केजरीवालांची केंद्राकडे मागणी ) ’ सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारने ‘आनंदाचा शिधा’ योजना जाहीर केली, राज्यातील तब्बल 7 कोटी लोकांनी ‘आनंदाचा शिधा’ योजनेचा लाभ घेतला, असा दावा खुद्द मुख्यमंत्र्यांनी केला. मात्र याबाबत ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्या काय सांगत आहेत? लाखो लोकांना तो मिळालाच नाही. शंभर रुपयांत दिवाळीच्या फराळासाठी जिन्नस मिळणार होते. लोक दोन-दोन दिवस रांगेत तिष्ठत उभे राहिले, पण जिन्नस मिळालेच नाहीत. जेथे मिळत होते तेथे आनंदाच्या शिध्याचा काळा बाजार सुरू होता. शेवटी लोकांनी ठरवले शिधा गेला तेल लावत’ अशी टीकाही सेनेनं केली.
‘ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील भारत-पाक क्रिकेट सामना आपण जिंकू शकलो. विराट कोहलीने एकदम धुवाधार फटकेबाजी केली. त्यामुळे हा सामना भारताने जिंकला, पण महाराष्ट्रात मिंधे गटाने तीन महिन्यांपूर्वी ‘सामना’ जिंकून जगात चैतन्य पर्व निर्माण केले नसते तर भारतीय क्रिकेटपटूंच्या ‘बॅटी’ होळीत टाकण्याच्या लायकीच्याही राहिल्या नसत्या. भारताने मेलबर्न जिंकले याचे संपूर्ण श्रेय मिंधे व फडणवीस यांनाच द्यावे लागेल. जगात सर्व काही घडते आहे ते त्यांचे सरकार आल्यामुळेच’ असा टोलाही सेनेनं लगावला.