मुंबई, 14 ऑक्टोबर : अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभुतपूर्व असा गोंधळ पाहण्यास मिळाला आहे. शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा बीएमसीने अडवून ठेवला होता. अखेरीस मुंबई कोर्टाच्या दणक्यानंतर मुंबई पालिकेनं लटके यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्याबद्दल पत्रक सुद्धा प्रसिद्ध केले आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंनी आपला उमेदवारही घोषित केला. मात्र, त्यांच्या उमेदवाराचा राजीनामा BMC कडून स्वीकारला गेला नाही. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नाही, तर त्यांची उमेदवारी अडचणीत सापडण्याची शक्यता होती. त्यामुळे ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेत आपला राजीनामा स्वीकारला जावा, अशी मागणी केली.
अखेर मुंबई उच्च न्यायालयाने लटकेंचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश दिले. शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत लटकेंचा राजीनामा मंजूर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने बीएमसीला दिले होते. अखेर आज सकाळी लटके या मुंबई महापालिकेत जाऊन राजीनामा दिला. तातडीने तो मंजूरही करण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी यांच्यामध्ये गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर बैठक झाली. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार असला तरी युती म्हणून बाळासाहेबांची शिवसेना गट युतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आणि सभा तसंच रोड शोमध्येही सहभागी होणार असं या बैठकीमध्ये ठरलं आहे. शिंदे गटाकडूनही डमी उमेदवार दिला जाणार अशी शक्यता होती. पण, आतापर्यंत झालेला संघर्ष पाहता शिंदे गटाकडून डमी उमेदवार उभं करण्याचा प्रस्ताव आता मागे घेण्यात आला आहे. ( अमित ठाकरेंना पाहण्यास आले अन् मोबाईल गायब झाले, कार्यकर्त्याचे पैसेही लांबवले ) वर्षा बंगल्यावरील बैठक संपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. भाजपच्या उमेदवाराचा युतीचा उमेदवार म्हणून पाठिंबा दिला आणि प्रचारही करणार असून रणनितीवरही चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. (शिंदे सरकार देणार सर्वसामान्यांना विजेचा शॉक, वीज दरवाढ आता अटळ!) अंधेरीच्या या पोटनिवडणुकीत आता मुरजी पटेल आणि ऋतुजा लटके यांच्यात सामना होणार आहे. आज म्हणजेच शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. 3 नोव्हेंबरला अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. 6 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे.