मुंबई, 25 नोव्हेंबर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. अनेक राजकीय नेते आणि संघटनांनी भगतसिंग कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. यानंतर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यपालांसह फडणवीस दिल्ली दौऱ्यावर - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यात ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाची भेट घेऊन राज्यपालांच्या बदलण्याच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यपाल बदलीबाबत केंद्रीय स्तरावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काय म्हणाले होते राज्यपाल - ‘आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील’ असं म्हणत राज्यपालांनी गडकरी आणि पवारांची तुलना महापुरुषांशी केली. हेही वाचा - ‘राज्यपालांबद्दल प्रोटोकॉलनुसार बोलता येत नाही, पण…’, सुप्रिया सुळेंचा अल्टिमेटम! उद्धव ठाकरेंनी केली जोरदार टीका - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा त्यांनी जोरदार समाचार घेतला. राज्यपालांकडून महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळ चालू आहे. मी त्यांना राज्यपाल म्हणंण बंद केलं आहे. वृद्धाश्रमातही ज्यांना जागा नाही, त्यांना राज्यपाल नेमलं जातं. महाराष्ट्र द्रोह्यांना इंगा दाखवण्यासाठी सर्वांनी एकत्र या. केंद्रान पाठवलेलं हे सॅम्पलं वृद्धाश्रमात पाठवा असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.