मुंबई, 05 ऑक्टोबर : शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपला वेगळा गट स्थापन केला आणि भाजपसोबत सरकार स्थापन केलं. आज शिवसेनेचा दसरा मेळावा आहे. पण, शिवसेना आणि शिंदे गट वेगवेगळे मेळावे घेत आहे. शिवसेनेचा इतिहासात आज पहिल्यांदाच हे घडत आहे. त्यामुळे अवघ्या देशाचे या मेळाव्याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या इतिहासात आजचा दिवस १९६६ च्या शिवसेना स्थापनेच्या पहिल्या वर्षीच्या दसरा मेळाव्याप्रमाणे असणार आहे. कारण आज शिवसेनेचे दोन मेळावे मुंबईत होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडामुळे दोन गट पडले आणि त्याचा परिणाम जसा राज्याच्या सत्तांतरावर झाला तसाच तो शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्यावरही झालेला पहायला मिळतोय. (Dasara Melava : मुख्यमंत्र्यांची ‘मोदी स्टाईल’, दसरा मेळाव्यात पुन्हा ठाकरेंवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करणार!) राज्यातीलच नाहीतर देशभरातील शिवसैनिकांना आपल्या आयुष्यात दोन दसरा मेळावा पाहण्याच्या आणि ऐकण्याचा योग येईल असे कधी स्वप्नातही वाटले नसेल. पण आता ती वेळ आलीय आणि वास्तवही आहे. शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होत आहे तर दुसरीकडे शिवसेनेत बंड करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदार आणि खासदारांचा दसरा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलातील मध्यवर्ती मैदानात होत आहे. (Dasara Melava : दसरा मेळाव्यात ठाकरे-शिंदेंचा सामना, राजकीय वातावरण तापलं, पण… असा आहे मुंबईचा Weather Report) शिवसेनेच्याच नाहीतर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजच दिवस अत्यंत महत्वाचा ठरणारा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली खरी शिवसेना कुणाची..? याचं उत्तर आज ठाकरे आणि शिंदे गट दसरा मेळाव्याच्या शक्तीप्रदर्शनातून देण्याचा प्रयत्नं करणार हे नक्की. मात्र छत्रपतींचा भगवा ध्वज खांद्यावर घेणारा सर्व सामान्य शिवसैनिक कुणाच्या दसरा मेळाव्यात विचारांचे सोने लुटणार? आणि कोणती शिवसेना खरी माणणार? याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.