मुंबई, 4 ऑक्टोबर : मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावेळी पहिल्यांदाच मुंबईत शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होत आहेत. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात उद्धव ठाकरे यांचा, तर वांद्र्याच्या बीकेसी मैदानात एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा होणार आहे. हे दोन्ही दसरा मेळावे आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहेत, त्यामुळे राज्यभरातून मुंबईत शिवसेनेचे कार्यकर्ते दाखल होत आहेत. दसरा मेळाव्यामुळे मुंबईतलं राजकीय वातावरण तापलं आहे, पण मुंबईतलं हवामान दिवसभर कसं असेल? हेदेखील महत्त्वाचं ठरणार आहे. अॅक्यूवेदरच्या रिपोर्टनुसार उद्या दिवसभर मुंबईमध्ये ढगाळ वातावरण असेल, तसंच पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. अॅक्यूवेदरच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत पावसाची शक्यता 80 टक्के आहे, तसंच गडगडाटासह पावसाची 16 टक्के शक्यता आहे. मुंबईचं बुधवारचं तापमान 32 अंश सेल्सियस असेल.
दसरा मेळाव्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होऊ नये, यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दोन्ही दसरा मेळावे आणि नवरात्र विसर्जनासाठी मुंबईत 3,200 ऑफिसर, 15,200 पोलीस, 1,500 एसआरपीएफचे जवान, 1,000 होमगार्ड, 20 क्युआरटी टीम आणि 15 बीडीडीएस टीमचा समावेश आहे. या दोन्ही दसरा मेळाव्यांआधी मुंबईच्या कायदा-सुव्यवस्थेचे जॉईंट कमिशनर विश्वास नांगरे पाटील यांनी सुरक्षेची पाहणी केली.