मुंबई, 4 ऑक्टोबर : मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्याआधी राजकीय वातावरण चांगलंच तापायला सुरूवात झाली आहे. दादरच्या शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा तर वांद्र्याच्या बीकेसी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होत आहे. या दोन्ही दसरा मेळाव्यांसाठी राज्यभरातून मुंबईमध्ये कार्यकर्ते येत आहेत, तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि संघर्ष होऊ नये, म्हणून पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा उद्या वांद्रे-कुर्ला संकुलातील मध्यवर्ती मैदानात होणार आहे. या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचंही लक्ष लागलंय. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या या दसरा मेळाव्याची सुरूवात संध्याकाळी 4 वाजता शिवसेनेच्या नव्या गीतांनी होणार आहे. तर नेत्यांची भाषणं संध्याकाळी 5.30 वाजता सुरू होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्यासपीठावर मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. शिवसेनेचे सर्व मंत्री 12 फुटांची चांदीची तलवार सर्वांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देतील. या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून किरण पावस्कर, शितल म्हात्रे, शरद पोंक्षे, आनंदराव अडसूळ, गुलाबराव पाटील, उदय सामंत, रामदास कदम या नेत्यांची भाषणं होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण रात्री 8 वाजता सुरू होणार असल्याची माहीती वरिष्ठ सुत्रांनी दिलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री 8 वाजता लाईव्ह येऊन अनेकांना धक्के दिले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील रात्री 8 वाजताच त्यांचं दसरा मेळाव्याचं भाषण करणार आहेत, त्यामुळे आता शिंदे उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का देणार का? हा सस्पेन्स वाढला आहे. दसरा मेळाव्यात सर्जिकल स्ट्राईक अनेक जण आपल्यासोबत येण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे अनेकांचे प्रवेश दसरा मेळाव्यात होतील,’ असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला होता. दसरा मेळाव्यासाठी जवळपास अडीच-तीन लाख कार्यकर्ते येतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ‘दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या गाड्यांसाठी दहा मैदानं बूक केली आहेत. जे कार्यकर्ते येतील त्यांच्या जेवणाची, पाण्याची आणि वॉशरूमची व्यवस्था नीट झाली पाहिजे. हे कार्यकर्ते आपल्यासाठी येत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,’ अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी नेत्यांना दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.