मुंबई, 10 नोव्हेंबर : महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अलर्ट जारी करण्यात आला आहे. दहशतवादी ड्रोन आणि छोट्या विमानांच्या साह्याने मुंबईत दहशतवादी हल्ले करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा यंत्रणा तैणात करण्यात आली आहे. याचबरोबर गुप्तचर यंत्रणाही पूर्णपणे सतर्क झाल्या असून मुंबईतील अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे.
मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईत रिमोट कंट्रोल विमानातून हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. एवढेच नाही तर मुंबईतील प्रमुख ठिकाणांसह दहशतवादी व्हीव्हीआयपींनाही लक्ष्य करणार असल्याचे बोलले जात आहे. मुंबईत सध्या ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, जर कोणी या नियमांचे उल्लंघन केले तर त्याला आयपीसी कलम 188 अंतर्गत शिक्षा केली जाईल.
हे ही वाचा : मालदीवमध्ये मोठी दुर्घटना; 9 भारतीयांसह 10 जणांचा होरपळून मृत्यू
बृहन्मुंबई पोलिस आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, दहशतवादी आणि देशद्रोही ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडरचा वापर करून हल्ला करू शकतात आणि व्हीव्हीआयपींनाही लक्ष्य करण्याची शक्यता आहे.
त्यामुळे खासगी हेलिकॉप्टर, हॉट एअर बलूनसह अन्य संशयास्पद गोष्टींच्या वापरावर पुढील 30 दिवस बंदी घालण्यात आली आहे. या काळात फक्त मुंबई पोलीस हवाई पाळत ठेवणार आहेत. हा आदेश 13 नोव्हेंबर ते 12 डिसेंबरपर्यंत लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
हे ही वाचा : कुटुंबाचं हादरवणारं पाऊल; या कारणामुळे एकाच घरातील 6 जणांनी घेतलं विष
याआधी 4 नोव्हेंबरलाही मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दहशतवादी हल्ल्याबाबत धमकी आली होती. धमकी मिळाल्यानंतर मुंबईतील तारदेव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि बॉम्ब शोधक व निकामी पथकाच्या व्हॅनच्या माध्यमातून संपूर्ण परिसराची झडती घेण्यात आली, मात्र काहीही सापडले नाही. फोन करणारा अज्ञात होता आणि पोलिसांनी नंतर दावा केला की धमकी देणारा मानसिक आजारी होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: 26/11 mumbai attack, Mumbai, Mumbai ATS, Mumbai News, Mumbai police