मुंबई, 08 जानेवारी : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एका फोनने मुंबई पोलिसांची झोप उडाली आहे. एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून शहरातील अनेक भागात बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली. 1993 च्या धर्तीवर मुंबईत ठिकठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचे अज्ञात व्यक्तीने फोन करून सांगितले आहे. यामुळे मुंबई पोलीस खात्यातील सगळ्याच यंत्रणा हाडबडून जाग्या झाल्या आहेत.
फोन करणाऱ्याने पोलिसांना सांगितले की, शहरात दंगल घडवण्यासाठी इतर राज्यातून बऱ्याच लोकांना बोलावण्यात आले आहे. या फोननंतर मुंबई पोलिसांची धावपळ उडाली. दरम्यान महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाला याबाबत माहिती देण्यात आली. या माहितीनंतर मुंबई एटीएसकडून कारवाई केली आहे.
हे ही वाचा : ‘शिवरायांचा अपमान करणारेच ‘औरंगजेबजी’ चा सन्मान करू शकतात, राऊतांचा बावनकुळेंवर निशाणा
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एका व्यक्तीने फोन केला. यामध्ये फोन करणाऱ्याने दावा केला होता की 2 महिन्यांत मुंबईतील माहीम, भिंडी बाजार, नागपाडा आणि मदनपूर भागात बॉम्बस्फोट होणार आहेत. हे बॉम्बस्फोट 1993 प्रमाणे मुंबईत होणार असल्याचा दावा फोन करणाऱ्या व्यक्तीन केला होता.
याशिवाय मुंबईत दंगल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यासाठी इतर राज्यातून लोकांना बोलावण्यात आले आहे. या फोन कॉलने मुंबई पोलिसांसह सुरक्षा दलही हादरले होते. फोन करणार्याचा शोध घेता यावा म्हणून पोलिसांनी तातडीने कॉल ट्रेस करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
मुंबईतील अनेक भागात बॉम्बस्फोट झाल्याची माहिती फोनवरून मिळाल्यानंतर महाराष्ट्र एटीएसची टीमही सक्रिय झाली. एटीएसने एकाला ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एटीएसने आरोपीला मुंबईतील मालाड भागातील पठाणवाडी येथून ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : ….तेव्हा कुठे गेले होते सो कॉल्ड हिंदुत्ववादी? राज ठाकरेंचा थेट सवाल
फोनवरून अशी धमकी का देण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, एटीएस आरोपींना पुढील चौकशीसाठी आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती आहे.