मुंबई, 12 जुलै: मुंबईत कोरोनाचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. त्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी कायम तत्पर असलेले वसईतील प्रसिद्ध डॉक्टर आणि माजी नगरसेवक हेमंत पाटील (वय-58) यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन झालं आहे.
नालासोपारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास डॉ. हेमंत पाटील यांची प्राणज्योत मालवली. कोरोनाची लागण झाल्यानंतर डॉ. हेमंत पाटील यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, गेल्या 10 दिवसांपासून ते अत्यवस्थ होते, अशी माहिती वसई-विरार महापालिकेचे महापौर प्रवीण शेट्टी यांनी दिली आहे.
हेही वाचा..अमिताभ-अभिषेक कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केली चिंता
डॉ. हेमंत पाटील हे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे कट्टर समर्थक होते. हितेंद्र ठाकूर यांनी स्वत: डॉ. पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. डॉ. हेमंत पाटील यांनी नगरसेवक आणि सभापतीपदही सांभाळले होते. गेल्या 10 वर्षांपासून वसई-विरार महापालिका तसेच नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाची सर्वस्वी जबाबदारी ते स्वतःहून सांभाळत होते.
दुसरीकडे, वसई-विरारमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. येथे कोरोनाबाधितांची संख्या 7613 पोहोचली आहे. त्यापैकी 5452 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 155 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2006 रुग्णांवर उपचार सुरू आहे.
हेही वाचा...कोरोनाची लस अंतिम टप्प्यात! 'हा' देश करणार तब्बल 20 कोटी व्हॅक्सिनचे उत्पादन
पालघर जिल्ह्यात कोरोनाचे 9 हजारांहून जास्त रुग्ण
पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी दिवसभरात पालघर जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल 390 नवे रुग्ण आढळले. तर 11 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित रुग्ण संख्येचा आकडा आता 9 हजारांहून जास्त झाल्याने पालघरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.