सोलापूर, 9 ऑक्टोबर: मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागं करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला सुरूवात झाली. तुळजा भवनीच्या मंदिरासमोर जागरण गोंधळ घालण्यात आला. 'आमचा संयम तोडायला लावू नका अन्यथा आम्ही तलवारी सुद्धा हातात घेऊ', असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला दिला. मात्र, संभाजीराजे यांची तलवार उपसण्याची भाषा योग्य नाही, अशा प्रतिक्रिया उमटल्यानंतर संभाजीराजे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टकरण दिलं आहे.
हेही वाचा...राजेंविरुद्ध गैर शब्द! प्रकाश आंबेडकर आणि गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा
वेळ आली तर आम्ही तलवार काढू या वक्तव्याबाबत खासदार संभाजीराजे यांनी खुलासा केला आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाने माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला आहे. मोर्चात सहभागी झालेला समुदाय प्रचंड आक्रमक झाला होता. त्यांनी तलवारी काढण्याची वक्तव्ये केली होती. त्यामुळे त्या समोरच्या जमावाला शांत करण्यासाठी मी म्हणाले की, तुम्ही शस्त्र कशाला काढताय मीच तलवार काढतो, असं स्पष्टीकरण यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी दिले आहे.
विजय वडेट्टीवारांबाबत केला गौप्यस्फोट...
विजय वडेट्टीवारांच्या भूमिकेने मी फार व्यथित झालो आहे. वडेट्टीवार मला एक बोलले आणि आता दुसरं बोलतायत, माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, त्यांनी असं करू नये, त्यांनी माझं संपूर्ण भाषण ऐकावं असेही खासदार संभाजीराजे म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी वडेट्टीवारांबाबत एक गौप्यस्फोट देखील केला. काल वडेट्टीवार मला म्हणाले की, ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देवू आज मात्र ते वेगळंच बोलतायत. त्यामुळे वडेट्टीवार दुहेरी भूमिका घेत असल्याचा गौप्यस्फोट खासदार संभाजीराजेंनी यावेळी केला.
दरम्यान, MPSC परीक्षेच्या बाबतीत माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं असून ते सकारात्मक निर्णय घेतील, तरीही परीक्षा झाल्या तर सकल मराठा समाज जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे, असेही खासदार संभाजीराजे म्हणाले.
तुळजापुरात नेमकं काय म्हणले संभाजीराजे?
मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी पडत असल्याचं दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नाही, असा घणाघाती आरोप संभाजीराजे यांनी यावेळी केला. आम्हला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, वेळ आल्यास तलवार पण काढेन, असा सज्जड इशारा खासदार संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे. आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत, अशा शब्दांत त्यांनी ठणकावलं.
हेही वाचा...ठाकरे सरकारचे येत्या काही दिवसांत तीन विकेट पडणार, भाजप नेत्यानं केला मोठा दावा
आम्ही दिल्लीला पण येण्यासाठी घाबणार नाहीत, अशा शब्दांत संभाजी राजे यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारला आव्हान दिलं आहे. माझा पक्ष गेला खड्यात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. राज्यात होणारी मराठा आंदोलनं भाजप पुरस्कृत नाहीत, असंही संभाजीराजेंनी यावेळी स्पष्ट केलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजले नाहीत, असा माणूस याचिका दाखल करतो दुर्दैवी आहे, अशा शब्दांत वकील गुणरत्ने सदावर्तेवर नाव न घेता संभाजीराजे यांनी टीका केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.