उदय जाधव, प्रतिनिधी मुंबई, 16 जुलै : महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार 17 जुलैपासून सुरूवात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर होणारं हे पहिलंच अधिवेशन आहे. 2 जुलैला अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आपल्यासोबत सर्वाधिक आमदार असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे, एवढच नाही तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही दावा सांगितला आहे. निवडणूक आयोगालाही याबाबत माहिती देण्यात आली असून अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची यावरून वाद सुरू असतानाच अधिवेशनामध्ये व्हीप कुणाचा लागणार? याबाबतही संभ्रम आहे. अजित पवार गटाकडून अनिल पाटील यांची प्रतोद (व्हीप) म्हणून तर शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. व्हीपच्या या गोंधळावरून अजित पवार यांनी राज्य सरकारने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी सूचक विधान केलं आहे. घोडा मैदान काही लांब नाही, उद्यापासून तुम्ही बघाल, असं अजित पवार म्हणाले आहेत. ‘भेट घेतली तर…’, अजित पवार-शरद पवार भेटीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया अधिवेशनात सरकारची भूमिका काय? ‘सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षाची उपस्थिती ठेवणे, आयुधांचा वापर करून योग्य पद्धतीने काम करू. लोकशाही आम्हाला माहिती आहे, सगळे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. पावसाचं प्रमाण म्हणावं तसं नाही, पण हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाने पाऊस पडला तर बळीराजा समाधानी राहील. उत्तरात थातूर मातूर सांगण्याचंकाम सत्ताधारी पक्षाकडून होणार नाही. आम्ही विरोधकांना व्यवस्थितपणे उत्तर देण्याचं काम करू. काल आम्ही नाशिकमध्ये होतो, तिथे 11 कोटींचं काम केलं,’ असं अजित पवार म्हणाले आहेत. ‘सगळ्यांना सूचना दिल्या आहेत, त्यानंतर महिलांबद्दल अपशब्द वापरले जात नाहीत. एकाच वेळी दोन्ही सभागृहात प्रश्न आल्यास आमच्यापैकी मुख्यमंत्री किंवा दोन उपमुख्यमंत्री यांच्यापैकी एक जण तिथे उपस्थित राहून उत्तर देतील,’ असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







