मुंबई, 18 सप्टेंबर : आगामी मुंबई महापालिका निडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर गेले असताना इकडे मुंबईतही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे उद्यापासून मुंबईतील शाखाप्रमुखांना वन टू वन भेटणार आहेत. अमित ठाकरे मुंबईतील सहा लोकसभा निहाय शाखाप्रमुखांना भेटणार आहेत. ते आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांचा शाखाप्रमुखांची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित ठाकरे वॉर्ड निहाय पक्षाच्या परिस्थितीचा शाखाप्रमुखांकडून आढावा घेणार आहेत. ( मुख्यमंत्र्यांची साद, ठाकरे देणार का प्रतिसाद? एकनाथ शिंदेंनी पुढे केला मैत्रीचा हात! ) अमित ठाकरे शाखाप्रमुखांशी मुंबईतील मनसे पक्ष कार्यालय राजगड येथे संवाद साधणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनसेची आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांच्या शाखाध्यक्षांसोबतच्या भेटी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांची आणि राज ठाकरे यांचे चांगले संबंध प्रस्थापित होताना दिसत होते. पण दुसरीकडे मनसे स्वबळावर निवडणुकीच्या तयारीला लागली असल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. नागपूरमध्ये पोहोचल्यानंतर राज ठाकरे यांनी नागपूर येथील शासकीय विश्रामगृह रवी भवन इथं बैठक घेतली आहे. यावेळी राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नागपूरमध्ये पक्षाची बांधणी का होत नाही? असा थेट सवाल विचारला. राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या जाणून समस्या घेतल्या.नागपूर पालिका निवडणुका जाहीर झाल्या असे समजून मतदारांमध्ये जा. कामाला लागा, आपल्याला प्रत्येक जागेवर उमेदवार लढवायचा आहे, असे आदेशच राज ठाकरे यांनी नागपूरच्या दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील प्रतिनिधीच्या बैठकीमध्ये दिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.