मुंबई, 18 सप्टेंबर : जून महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये सत्तानाट्य घडलं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आणि 10 अपक्ष अशा 50 जणांना घेऊन बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात रोजच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, पण आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरेंना मैत्रीसाठी साद घालण्यात आली आहे. यानंतर आता याला उद्धव ठाकरे कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगळे वाद मिटतात, पण क्षमा करण्यासाठी मोठं काळिज लागतं, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. भारत जैन महामंडल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विश्व मैत्री दिवसाच्या क्षमापना समारोहाला एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
भारत जैन महामंडल यांच्या वतीने आयोजित विश्व मैत्री दिवसाच्या क्षमापना समारोहाला उपस्थित राहून जैन साधू आणि साध्वींना अभिवादन करून त्यांचे आशिर्वाद घेतले. pic.twitter.com/cT3MpgSO3b
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 18, 2022
शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्यावरूनही शिंदे-ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून परवानगी मागण्यात आली, पण ही परवानगी कोणालाच मिळणार नाही, अशी माहिती आता समोर येत आहे. तर दुसरीकडे दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाला बीकेसी मैदानात परवानगी मिळाली आहे. ठाकरे गटानेही बीकेसी मैदानात दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला होता. शिवसेना कुणाची? शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार? हा वाद सध्या सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाकडे आहे. तर दसरा मेळाव्यावरूनही दोन्ही गटांमध्ये वाद सुरू आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मैत्रीचा हात पुढे केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.