मुंबई, 31 ऑक्टोबर : अमरावतीचे आमदार रवी राणा आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये वाद पेटला होता. अखेरीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेट झाल्यानंतर रवी राणा यांनी सपशेल माघार घेतली आहे. बच्चू कडू यांच्याबद्दल विधान केल्यानंतर रवी राणांनी दिलगिरी व्यक्त केली. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद मिटवण्यासाठी रविवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कडू आणि राणा वादावर दोन तास चर्चा झाली. त्यानंतर सकाळी रवी राणा यांनी सकाळी फडणवीस यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर रवी राणा मवाळ झाले. (पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून 400 रुपयांची वसुली, महसूल मंत्री विखेंच्या जिल्ह्यातला LIVE VIDEO) ‘गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता, शब्दाशब्दांमधून वाद सुरू होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत साडेतीन तास बैठक झाली. जे काही वाद झाले, जे काही शब्द वापरले गेले त्यावरून वाद झाला होता. ते शब्द मी मागे घेतो. आता बच्चू कडू आणि मी अमरावतीचे आमदार आहोत. बोलता बोलता तोंडातून जे काही गुवाहाटीबद्दल निघालं, शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार, नेते, सहकारी आहे, ते सगळे आमच्या सोबत आहे. त्यामुळे गुवाहाटीबद्दल काही बोललो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो’ अशा शब्दांत रवी राणांनी यू-टर्न घेतला.
‘पण बच्चू कडू यांच्या सुद्धा काही अपशब्द निघाले होते. मी खिसे कापून लोकांना किराणा वाटतो, हे न पचणारे आहे. त्यामुळे बच्चू कडू आपले शब्द मागे घेतली. आम्ही दोघेही सरकारचे घटक आहोत. त्यामुळे या पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारसोबत आहोत, सरकारला बळकट करण्याचे काम करणार आहोत’ असंही राणा म्हणाले. (‘सत्तार मला कधीही आऊट करणार नाही, नेहमी जिंकण्यासाठीच..’; इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने पिकला हशा) ‘आमच्या वादापेक्षा किंवा शब्दाचा गैरअर्थ काढण्यापेक्षा आमदार आणि सहकाऱ्यांमध्ये गैरसमज झाला असेल किंवा कुणाची मनं दुखावली असेल तर माझे शब्द मागे घेतो. कुणाला आक्षेप असेल आणि कुणाची मनं दुखावली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. माझ्याकडून हा वाद संपला आहे, असंही रवी राणांनी स्पष्ट केलं.