मुंबई, 27 ऑक्टोबर : विधान परिषदेच्या आणि राज्यसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात क्रॉस व्होटींग झाल्यामुळे भाजपच्या काही जागा निवडून आल्या. यामुळे राज्यात महाविकास आघाडीतील काही आमदारांनी भाजपला मतदान केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली होती. यानंतर काँग्रेसच्या आमदारांनी मतदान केल्याची माहिती समोर आली होती. यावर काँग्रेसचे आमदार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच राष्ट्रवादीमध्येही धुसफूस सुरू असल्याचे बोलले जात आहे. या सगळ्यावर आता भाजप नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी वक्तव्य केल्याने पुन्हा नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दानवे पुढे म्हणाले की, आम्ही मागच्या 3 वर्षांपासून सांगते आलो आहे कोणाचेही सरकार पाडणार नाही ते आपल्या कर्माने पडले तर त्याचा दोष भाजपाला देता येणार नाही. शिवसेनेच्या आमदारांविरोधात पराभूत झालेल्यांना ताकद देण्याचं काम मविआतील नेत्यांनी केले. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आमदारांनी उठाव केला. शिंदे गटातील आमदारांना भाजपात घेण्याचं कारण नाही कारण आम्ही दोघे एकच आहोत. एकत्र सरकार चालवतोय असं विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केले आहे.
हे ही वाचा : ‘तुम्ही आज त्याचेच परिणाम भोगताय’; प्रवीण दरेकरांनी घेतला ठाकरे गटाच्या त्या विधानाचा समाचार
तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले आमदार फुटण्याच्या तयारीत आहेत. ते त्यांच्याच पक्षात नाराज असल्याने आमच्यासोबत चर्चा करत आहेत. शिंदे गट फुटण्याआधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील आमदार फुटण्याची शक्यता आहे. शिंदे गटातल्या एकाही आमदाराला भाजपमध्ये घेणार नसल्याचे ते म्हणाले. शिंदे गटातील नाराज आमदार भाजपात विलीन होणार असा दावा सामना मुखपत्रातून शिवसेना ठाकरे गटाने केला होता. त्यावर दानवेंनी हे स्पष्टीकरण दिले. आम्ही सरकार चालवत आहोत.
आम्हाला उर्वरित काळ पूर्ण करून त्यापुढील 5 वर्षही सरकार आणायचं आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज आहेत वैगेरे असं उद्धव ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादीवाले म्हणणार नाहीत तोवर त्यांच्याकडे शिल्लक असणारे आमदार स्वस्थ बसणार नाहीत. कारण त्यांच्याकडील अनेक आमदार पक्षातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. आपल्याकडे असलेले पळू नयेत म्हणून ही अफवा सोडली आहे असा दावा दानवेंनी केला.
हे ही वाचा : Ujjwal Nikam : ठाकरे गटाला दिलासा देत उज्जवल निकम यांची निवडणूक आयोगाच्या कारवाईवर टीप्पणी
दरम्यान, या राज्यातल्या राजकारणाचा कुणीच अंदाज लावू नका. राजकीय परिस्थिती जशी निर्माण होईल तसे वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतले जातील. जो निर्णय वरच्या पातळीवर होईल तो आम्ही पाळू. आता काँग्रेस-राष्ट्रवादीकडे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ता नसली तरी चालेल आहे ते टिकले पाहिजे अशी भूमिका आहे. उद्धव ठाकरे हेदेखील अस्तित्व टिकवण्यासाठीच कुणाशीही युती करत आहेत असा टोलाही रावसाहेब दानवेंनी विरोधकांना लगावला.