जळगाव, 15 ऑक्टोबर : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील त्यांच्या रोखठोक भाषणांमुळे चर्चेत असतात. ते अनेकदा त्यांच्या विविध विधानांमुळे चर्चेत येतात. यावेळीदेखील त्यांचं एक विधान चर्चेला कारण ठरलं आहे. ते राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत पिण्याचं पाणी पोहोचवण्यासाठी ते सर्वोतोपरी मेहनत करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. तसेच ते आगामी काळात राज्यात पाणी पुरवठ्याच्या अनेक योजना राबवणार आहेत. याबाबत त्यांनी स्वत: माहिती दिली आहे. तसेच आपल्याला जनता आणि कार्यकर्त्यांपुरता फक्त गुलाब भाऊ म्हणून मर्यादित राहायचं नाही तर पाणीवाला बाबा व्हायचंय, असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं आहे.
पाणीपुरवठा खाते मिळाल्यास मला असं वाटलं आपण काहीतरी करू शकतो आणि त्यातूनच अनेक पाण्याच्या योजना या राज्यात दिल्या. अनेक योजना सुरू करणार असल्याचे स्पष्ट करत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मला गुलाब भाऊ नाही तर पाणीवाला बाबा व्हायचं असल्याचं म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर श्रोत्यांमध्ये टाळ्यांचा गजर झाला. तसेच त्यांच्या भाषणातील या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही आता व्हायरल होऊ लागला आहे.
(राहुल गांधींच्या 'भारत जोडो'ला सोनिया गांधींचीही साथ, पण प्रियंका गांधी नेमक्या कुठे?)
गुलाबराव पाटील आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले?
"पाणी पुरवठा विभाग मिळाल्यानंतर मला वाटलं की आपण काहीतरी करु शकतो. नांदेडजवळ हिमायत नगर तालुका आहे. तिथे मी पाणी पुरवठा विभागाकडून 1 हजार कोटींची योजना दिली. सोमवारी सिल्लोडला चाललोय. तिथे दहा ते बारा योजनांचं उद्घाटन आहे. मला गुलाब भाऊ नाही व्हायचंय, तर पाणीवाला बाबा व्हायचंय, हे मी ठरवलं आहे", असं गुलाबराव पाटील आपल्या भाषणात म्हणाले.
'मला गुलाब भाऊ नाही, पाणीवाला बाबा व्हायचंय', गुलाबराव पाटील यांचं भाषणातील विधान #GulbraoPatil #Jalgaon #Maharashtra pic.twitter.com/mRNqjCqLFb
— News18Lokmat (@News18lokmat) October 15, 2022
गुलाबरावांच्या मतदारसंघातच नागरिकांना पाणी मिळेना?
एकीकडे गुलाबराव पाटील पाणी पुरवठा योजनांच्या वेगवेगळ्या घोषणा करत आहेत. पण त्यांचा मतदारसंघ असलेल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव तालुक्यात पिण्याचं पाणी वेळेवर येत नाही म्हणून अनेकवेळा नागरिकांनी आंदोलन केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील त्यांच्या तक्रारींची दखल घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gulabrao patil, Jalgaon