मुंबई, 15 ऑक्टोबर : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देश पिंजून काढताना दिसत आहेत. ते देशभरातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या यात्रेतून ते पक्षालादेखील नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला दक्षिण भारतात उत्सफुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा प्रतिसाद पाहता राहुल गांधी यांच्या आई, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या देखील या यात्रेत सहभागी झाल्या. सोनिया गांधी या गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात बरेच दिवस उपचार सुरु आहेत. या दरम्यान त्यांच्या पाठीमागे ईडीचा ससेमिरा लागलेला होता. त्यामुळे सोनिया गांधी या दुहेरी संकटात सापडलेल्या बघायला मिळाल्या. पण या सगळ्या संकटांना सामोरं जात सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी राहुल गांधी यांनी सोनिया यांना पायी न चालता गाडीत बसून यात्रेत सहभागी होण्याची विनंती केली होती. यावेळी त्यांनी सोनिया यांच्या बुटाची लेसही बांधल्याचं दृश्य बघायला मिळालं होतं. अतिशय भावनिक हा सगळा प्रसंग होता. संबंधित प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर संबंधित प्रसंगाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळाला. या दरम्यान एक प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय. राहुल आणि सोनिया भारत जोडो यात्रेत व्यग्र असताना काँग्रेस नेत्या आणि राहुल यांच्या बहीण प्रियंका गांधी कुठे आहेत? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय. त्याचबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हिमाचल प्रदेशची विधासभा निवडणूक जाहीर झाली आहे. हिमाचल प्रदेशच्या 68 विधानसभा जागांसाठी 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 8 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी या हिमाचल प्रदेशातच पक्षाची रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. प्रियंका गांधी यांनी काल हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या सभेत मोठी घोषणा केली. हिमाचलमध्ये काँग्रेसचं सरकार आल्यास 1 लाख तरुणांना सरकारी नोकरी देऊ आणि जुनी पेंशन योजना पुन्हा सुरु करु, असं वचन दिलं. त्यांच्या या घोषणेची दखल देशभरातील प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. विशेष म्हणजे या निमित्ताने प्रियंका गांधी नेमक्या कुठे व्यस्त आहेत याची माहिती समोर आली आहे.
( ‘वर्षा’वर हालचालींना वेग, राज ठाकरेंनंतर काँग्रेसचे तीन बडे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ) प्रियंका गांधी नेमकं आहेत कुठे? हिमाचल प्रदेशच्या सोलन जिल्ह्यातील ठोडो मैदानात परिवर्तन प्रतिज्ञा रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत संबोधित करताना प्रियंका गांधी यांनी मोठ्या घोषणा केल्या. “हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यास पहिल्याच कॅबिनेट बैठकीत जुनी पेंशन योजना पुन्हा सुरु करण्याचा आणि राज्यातील एक लाख बेरोजगार तरुणांसाठी रोजगार देण्याचा निर्णय घेतला जाईल”, असं वचन प्रियंका गांधी यांनी दिलं. “राज्यातील दोन लाख कर्मचारी हे जुनी पेंशन योजना सुरु करण्याची मागणीसाठी दोन महिन्यांपासून धरणे आंदोलनाला बसले आहेत. पण सरकार त्यांच्या आंदोलनाती दखल घेऊन त्यावर काहीच प्रतिक्रिया देण्यास तयार नाही”, असं प्रियंका गांधी या रॅलीत म्हणाल्या.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने केला 1000 किमीचा प्रवास दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा मोठ्या जोशात पुढे सरकत आहे. राहुल गांधी यांची गेल्या 38 दिवसांपासून ही यात्रा सुरु आहे. सध्या ही यात्रा कर्नाटकात दाखल झाली आहेत. राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबरला कन्याकुमारी येथून या यात्रेला सुरुवात केली होती. तिथून ही यात्रा तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश हे तीन राज्य पार करत कर्नाटकातून प्रवास करत आहे. ही यात्रा आज कर्नाटकातील बेल्लूर येथे दाखल झालीय. राहुल गांधींच्या या यात्रेने आतापर्यंत 1000 किमीच्या टप्पा पार केला आहे. त्यामुळे या यात्रेची देशभरात दखल घेतली जात आहे.