नागपूर, 10 जून: नागपूर शहरात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यात शहरातील कोरोनाचा हॉटस्पॉट समजला जाणारा नाईक तलाव आणि बांगलादेश परिसरात झालेल्या मटण पार्टीवरून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय आमने-सामने आले आहेत.
हेही वाचा... पुण्यात भीषण अपघात! भरधाव कार पडली विहिरीत, आईसह दोन चिमुरड्यांचा करुण अंत
शहरातील नाईक तलाव आणि बांगलादेश परिसरात बुधवारी 61 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. या परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 150 वर पोहोचली आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी मटण पार्टी झाली होती, त्यामुळेच कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे नाईक तलाव आणि बांगलादेश परिसरात मटण पार्टी झालीच नसल्याचं पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी दावा केला आहे. यावरून दोन्ही अधिकारी आमने-सामने आले आहेत.
नागपूरच्या नाईक तलाव आणि बांगलादेश परिसारात कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे नाईक तलाव परिसरात मटण पार्टीवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्यास मटण पार्टी करणीभूत असल्याचं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे. मात्र, आमच्या चौकशीत अशी कोणतीही बाब आढळली नसल्याचं नागपुरचे पोलिस आयुक्त यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले महापालिका आयुक्त?
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, जो नागरिक पॉझिटिव्ह आला होता त्याच्या घरी लॉकडाऊन झाल्यानंतर एक पार्टी झाली होती. डेफिनेटली अशीच काहीतरी केस झाल्याशिवाय एवढा मोठा हॉटस्पॉट होऊ शकत नाही. मटण पार्टीमुळे नाईक तलाव आणि बांगलादेश परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा... टीव्हीवर कार्टून बघण्यास आईनं केला विरोध, पुण्यात 14 वर्षीय मुलानं घेतला गळफास
दरम्यान, नागपूर शहरातील नाईक तलाव आणि बांगलादेश परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. यावरून महापालिका व पोलिस विभागात एकमत दिसून आले नाही. नागपुरात मोमीनपुरानंतर हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. सध्या या परिसरात 150 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
संपादन- संदीप पारोळेकर