4 वर्षांपूर्वी जळालं होतं घर, अद्यापही स्मशानात राहून करावा लागतोय जीवनाशी संघर्ष

4 वर्षांपूर्वी जळालं होतं घर, अद्यापही स्मशानात राहून करावा लागतोय जीवनाशी संघर्ष

आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांचा गौरव होत असताना तळेगाव दाभाडे याठिकाणीच्या एका महिलेच्या नशीबी मात्र स्मशानभूमी आहे. गेल्या 4 वर्षांपासून ही महिला स्मशानात वास्तव्य करत आहे.

  • Share this:

अनिस शेख, मावळ, 08 मार्च : आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांचा गौरव होत असताना तळेगाव दाभाडे याठिकाणीच्या एका महिलेच्या नशीबी मात्र स्मशानभूमी आहे. याठिकाणच्या बनेश्वर स्मशानभूमीत गेल्या चार वर्षापासून आपल्या दहा वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन संगीता शिंदे वास्तव्य करत आहेत. ऊन-वारा-पाऊस कशाचीही पर्वा न करता समोर आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी निडरपणे त्या उभ्या आहेत.  तळेगावमधील जाधव वाडीत ४ वर्षांपूर्वी त्यांचे राहते घर एका अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले.  या दुर्देवी घटनेमध्ये सारा संसार उद्धस्त झाला. संसारातील सर्व उपयोगी वस्तू जळून राख झाल्या. दैव बलवत्तर असल्याने संगीता यांचा चिमुकला आणि त्या या घटनेतून सुखरूप बचावल्या. पण घराची मात्र राखरांगोळी झाली झाली.

स्वतःवर कोसळलेला दुःखाचा डोंगर सर करण्यासाठी या माऊलीने गावकऱ्यांकडे मदत मागितली. पण तिची परिस्थिती पाहून कोणाच्याही काळजाला पाझर फुटला नाही. दाभाडे राज घराण्यातील सत्येंद्र राजे दाभाडे यांनी या निराधार महिलेला मदतीचा हात देत बनेश्वर येथील स्मशानभूमीत झोपडं बनवण्यासाठी चार वर्षांपूर्वी जागा दिली, त्या दिवसापासून आजतागायत संगीता स्मशानातच राहत आहेत.

(हे वाचा-उभं पीक जळताना पाहून शेतकऱ्याने घेतली धाव, मात्र काळाने त्याच्यावरच घातला घाव)

जसजसे दिवस सरत गेले तशा त्यांच्या अडचणी देखील वाढत गेल्या. पण म्हणतात ना, 'मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा...', असाच काहीसा संघर्ष संगीता करत आहेत. अनेक शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवत त्यांनी घरासाठी लागणारी काही महत्त्वाची कागदपत्रे बनवून घेतली. केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यालयामध्ये अनेकदा खेटे घालून, पत्रव्यवहार करून हक्काच्या घराची मागणी गेली पण सरकारकडून कागदी घोडे नाचवण्या पलीकडे त्यांच्या पदरी फक्त निराशाच पडली. तरीही न थकता त्यांनी आपली लढाई सुरूच ठेवली आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी धुणीभांडी करून संगीता स्वतःचा आणि मुलाचा सांभाळ करीत आहेत.  त्यात बऱ्याच वर्षांपूर्वी कामाच्या शोधात गेलेला त्यांचा पती आजतागायत घरी परतला नाही आहे. चिमुकल्याबरोबर या माऊलीने निरभ्र आकाशाखाली स्मशानभूमीतच संसार मांडला आहे.  एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या दहाव्या-बाराव्याच्या दिवशी मिळणारं अन्न आणि गावात मोलमजूरी करुन संसाराचा गाडा त्या कसाबसा हाकलत आहेत.

(हे वाचा-नवयुगाची प्रेरणा, भारतातल्या 'नारीशक्ती'ला सलाम; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान)

डोक्यावर छप्पर असावं ही या माऊलीची इच्छा काही पूर्ण होत नाही आहे. येणारा प्रत्येक दिवस नवीन उमेद घेऊन ती जीवन जगत आहे. चार वर्षापासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला एकदा तरी यश  येईल आणि मायबाप सरकार मला हक्काचे घर देईल याच भोळ्या आशेवर ती स्मशानात दिवस घालवत आहे.

First Published: Mar 8, 2020 09:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading