मुंबई 14 मार्च : खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतंच एक ट्वीट शेअर (Supriya Sule Tweet) करत महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक केलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) शेअर केलेला एक व्हिडीओ रिट्वीट करत सुप्रिया सुळेंनी हे ट्वीट केलं आहे. महाराष्ट्र पोलीस सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात असं म्हणत त्यांनी औरंगाबादमधील एका घटनेचं उदाहरण दिलं आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटलं, की महाराष्ट्र पोलीस सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात, याचं उदाहरण औरंगाबाद येथील पोलीस कर्मचारी हनुमंत चाळनेवाड यांनी दाखवून दिलं. एका परीक्षार्थीला वेळेत परीक्षा केंद्रावर सोडण्याचं काम त्यांनी केलं. त्यांचं हे काम कौतुकास्पद आहे. औरंगाबादमध्ये शनिवारी लॉकडाऊन असल्यानं प्रवासाठी वाहनांची सोय नव्हती. याचवेळी हनुमंत चाळनेवाड या तरुणीच्या मदतीला धावून आले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली होती आणि पोलीस कर्मचाऱ्याचं कौतुक केलं होतं. आपल्या ट्वीटमध्ये देशमुख म्हणाले, ‘औरंगाबादमध्ये शनिवारी लॉकडाऊन सुरू असताना रेल्वे बोर्डाची परीक्षा द्यायला जाणारी विद्यार्थिनी वाहन मिळत नसल्याने गोंधळली होती. मात्र, पोलीस शिपाई हनुमंत चाळनेवाड यांनी तिला स्वतः परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचविले. चाळनेवाड यांच्या या माणुसकीला माझा सलाम!’ अनिल देशमुख आणि सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या ट्वीटनंतर सगळेच या पोलीस कर्मचाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.