औरंगाबाद 12 मार्च : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार की तिथीनुसार असा वाद गेली अनेक वर्ष राज्यात सुरू आहे. सरकार तारखेनुसार महाराजांची जयंती साजरी करते तर शिवसेना आणि मनसे हे तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात. मात्र आता उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असल्याने तारखेप्रमाणे सरकारने आणि तिथीप्रमाणे शिवसेनेने जयंती साजरी केली. तर मनसेच्या वतीने औरंगाबादमध्ये शिवजयंती साजरी केली गेली. मनसेप्रमुख राज ठाकरे हे औरंबादमध्ये उपस्थित होते. जयंती उत्सवाच्या वादावर त्यांनी आपली भूमिका या कार्यक्रमात स्पष्ट केली. ते म्हणाले, वर्षातले 365 दिवस महाराजांची जयंती धुमधडाक्यात साजरी झाली पाहिजे. फक्त एक दिवस नाही. राज ठाकरे पुढे म्हणाले, काही वर्षांपूर्वी मी कालनिर्णयकार जयंत साळगावकर यांच्या भेटीला गेलो होतो. त्यावेळी त्यांना तारखेच्या वादाबाबत विचारलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की महाराज हे युगपुरूष होते त्यांची जयंती ही वर्षभर साजरी झाली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे हिंदुधर्मातले सर्व सण उत्सव हे तिथीप्रमाणेच साजरे केले जातात. ते तारखेप्रमाणे केले जात नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे आणि त्यामुळे त्यांची जयंती ही तिथीप्रमाणेच साजरी झाली पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. कोरोनाच्या संकटामुळे शिवजयंती साजरी होईल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात होती. आपल्या देशात आधीच एवढी रोगराई आहे की आणखी एक त्यात कोरोना आलं तर काय फरक पडतो असा उपरोधीत सवालही त्यांनी केला. मात्र असं असलं तरी सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. ज्यांना लागण झाली तेही लवकरच बरे होतील असंही ते म्हणाले. हे वाचा… खडसेंना पुन्हा धक्का, राज्यसभेचा पत्ता कट, या नेत्याला मिळाली उमेदवारी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.