बीड, 7 जानेवारी: गेल्या काही वर्षांत राजकीय मैदानात एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणारे मुंडेंचे कार्यकर्ते चक्क एकत्र येण्याचा चमत्कार घडला आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण भावंडांमधून विस्तवही जात नव्हता. पण आता मात्र ही कटुता कमी होत असल्याचा प्रत्यय येतो आहे. मुंडे बंधू-भगिनींच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत परळी पंचायत समितीच्या सभापतींविरोधात अविश्वास ठरवा मांडला आणि तो मंजूरही करून घेतला. या वेळी भाजपच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते धावून आल्यानं आश्चर्य व्यक्त हो आहे.
गुरुवारी परळी पंचायत समितीच्या सभापती उर्मिला गित्ते यांच्याविरोधात अविश्वास ठरवा भाजपच्या सदस्यांनी मांडला. परळी तहसील कार्यालयात या ठरावावरचा निर्णय होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी या ठरावाला चक्क पाठिंबा दिला. त्यामुळे अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला. उर्मिला शशिकांत गित्ते यांचं पद गेलं यापेक्षाही या ठरावाच्या निमित्ताने पंकजा आणि धनंजय मुंडे एकत्र आल्याची चर्चा तालुक्यात अधिक सुरू आहे.
गेल्याच महिन्यात धनंजय मुंडे यांनी राजकीय कडवटपणा घरात नाही, अशा अर्थाचं वक्तव्य केलं होतं. म्हणजे बहीण-भावामधली कटुता कमी झाल्याची चर्चा तेव्हापासूनच सुरू होती. आता पंचायत समितीच्या ठरावामुळे यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. प्रत्यक्ष अविश्वास ठरावाच्या चर्चेवेळी स्वतः सभापती उर्मिला गित्तेच गैरहजर होत्या. त्यामुळे पंचायत समितीच्या सदस्यांनी सभापतींविरोधात 10 विरुद्ध एक मताने मंजूर झाला. या वेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी एकत्रित हा ठराव मंजूर केला.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी एकमेकांविरोधात प्रचाराचा धुरळा उडवणारे मुंडे बंधू-भगिनी यांच्या नात्यात किती कटुता आहे, हे राज्यानं पाहिलं होतं. या निवडणुकीच्या वेळी एकमेकांवर वैयक्तिक आरोपांची राळही उडवण्यात आली होती. त्यामुळे आता ही कटुता कमी होत असल्याची चर्चा आहे.